तीन गझला : सौ.रश्मी देवगडे




१.


तो जीवन गाण्याचा गंधार कुठे आहे

कोमल मन वीणेचा झंकार कुठे आहे


अतिरेक कसा झाला वाईट विचारांचा

आचार शिकविण्याचा संस्कार कुठे आहे


दारिद्र्य जरी आहे ते लाजिरवाणे का

साध्या सवयींचा तो संसार कुठे आहे


मरगळ इतकी आहे सामान्य जनांमध्ये

वीजेसम बुद्धीचा संचार कुठे आहे


का पाळत गेले मी रीती बुरसटलेल्या

भ्रांती बदलवणारा अंगार कुठे आहे


२.


वेदनेस मी सदैव प्रेमगीत मानते

अंतरातला निनाद शांत मंद्र ठेवते


मौन पाळते जनात स्वैर वर्तनापुढे

मात्र नेत्र पल्लवीत तीक्ष्ण बाण मारते


वाचते मनास रोज थांग शोधते जरा

पैलतीर गाठताच सर्व मात्र संपते


चालते विचार चक्र गरगरत मनामधे

शेवटास प्राक्तनास बोल मात्र लावते


बोलते जगासमोर अडखळत कधी कधी

भावनेत वेदनेस रोज रोज गुंफते


३.


आसवांचा केवढा आधार झाला

दुःख भोगावे असा संस्कार झाला


काय घडले काय सांगू मी तुम्हाला

फक्त हृदयाचा कधी व्यापार झाला


गाव माझे आसवाने चिंब झाले

सूर्य असतानाच मग अंधार झाला


आसवांची नाव भिरभिरते जराशी

पापणीचा बांध तर बेजार झाला


गायले मी गीत विरहाचे मनाशी

तो व्यथेचा आगळा श्रृंगार झाला

..................................................


No comments: