१.
बोलायाचे बरेच आहे बोलू आधी मुद्द्यावर
बिनकामाची कशास चर्चा तुझ्या नि माझ्या नात्यावर
सूर्य पाहणे सोपे आहे सूर्य व्हायचे पण अवघड
मलाच माझी म्हणे सावली ऐन दुपारी रस्त्यावर
दुःख, वेदना, घाव, उपेक्षा जाती वाहुन तिथे त्वरित
चार मैत्रिणी नित्य भेटती यासाठी पाणवठ्यावर
काही डोळे ओले व्हावे अंतासमयी माझ्याही
राखुन आहे पुण्य तेवढे आयुष्याच्या खात्यावर
जिद्दीचे मी धनुष्य हाती घेउन लढले दुनियेशी
भिस्त ठेवली होती तेव्हा फक्त रिकाम्या भात्यावर
झाड लागले किती थरथरू विचार करताना पुढचा
नेम पारध्याने धरलेला होता गात्या पक्ष्यावर
प्रेमाने अन् जोराने दे नकोस खाऊ कच आता
अखेर व्हावी दरीत माझी तूच दिलेल्या धक्क्यावर
दोर बांधुनी गळ्यात काळा मणी ओवले सोन्याचे
मला नाचवत उभे मदारी ढोल वाजवत ठेक्यावर
२.
एक कोवळे पान पाहुनी इतका गलका झाला
आनंदाने पानगळीचा ऋतूच हिरवा झाला
फेऱ्यांवरती फेरे नुसते फेऱ्यांवरती फेरे
प्रवास म्हणता म्हणता त्याचा भयाण चकवा झाला
वेळ बदलता महत्त्वसुद्धा बदलत जाते नक्की
शेव नि चिवडा दिवाळीतला... नंतर चखणा झाला
लिहून कविता पावसामधे नावा सोडत गेले
कविता मिटल्या, नंतर त्यांचा नुसता लगदा झाला
किती तऱ्हेची मनात ओझी वाहत पाउस होता
बरसत गेला दिवसदिवस अन् प्रचंड हलका झाला
तुझे बोलणे प्रेमाने मी झेलत होते अन् मग
आधी आर्जव नंतर त्याचा हळूच फतवा झाला
डोंगर, उतार, घरे, गुरे अन् किती देखणी वाडी
एका रात्री माणसांसकट त्यांचा मलबा झाला
३.
फूल उमलले सुंदर पण ते सुकणारच ना
उत्पत्ती आहे त्याला लय असणारच ना
वाद घातला किती जरी जिंकेल कसा तो?
अश्रू येता तिचे दाटुनी.. हरणारच ना
शिवराळच जर तुझीच वाणी ... काय करावे
लेक तुझा मग तशीच भाषा शिकणारच ना
निघून जाणे तुझे न आता छळते इतके
जुन्या व्रणावर खपलीसुद्धा धरणारच ना
एकांताला गतकाळाचा शापच असतो
नकोनकोसा क्षण एखादा छळणारच ना
दार वाजवत उभेच होते ... उघडले न मी
सौख्य अशाने माझ्यावरती रुसणारच ना
खोट्याला मी खोटे म्हटले ... गोंधळ झाला
अशा वागण्याला दुनिया तर हसणारच ना
............................................................

No comments:
Post a Comment