तीन गझला : जयराम धोंगडे




१.


ना जिंकवते ना हारवते केवळ

प्रत्येकाला वेळ शिकवते केवळ


वाटत असते उंदरासही सुटलो

मांजर तर त्याला खेळवते केवळ


पद पैशाची किमया मोठी असते

निष्ठेसोबत नियत चळवते केवळ


कुणी कुणाचा सखा सोबती नसतो

जग हे स्वार्थी सूत जुळवते केवळ


आषाढी मेघ सावळे दिसले की

मती विठ्ठला मला झुरवते केवळ


२.


चांगुलपणास नाही काही प्रमाण मित्रा

साऱ्याच संकटावर तू रामबाण मित्रा


मी संभ्रमात पडता तू सांगतोस गीता

युद्धात जीवनाच्या भरतोस त्राण मित्रा


रक्तापल्याड नाते नात्यापल्याड आस्था

जगण्यात येत जाते केवळ उधाण मित्रा


मी जीव लावण्याचा वाखाणतो उमाळा

घेतो निरोप आता करतो प्रयाण मित्रा


देऊ नकोस खांदा माझ्या कलेवराला

वापस कुडीत माझ्या येईल प्राण मित्रा


३.


आनंदल्या मनाला कसलीच खंत नाही

चिडण्या नि चिडवण्याला, मजला उसंत नाही


त्यांचा प्रभाव आहे माझ्या तनामनावर

सारे ऋतू कलंदर, केवळ वसंत नाही


जमते तसे कराया सरसावतो पुढे मी

नन्नातल्या सुराचा, पाढा पसंत नाही


साधासुधा तसा मी साधे विचार माझे

पटल्यास घेत जावे, मी साधुसंत नाही


लिहिण्यामुळे मिळाला गोतावळा मला हा

सांगा कसा म्हणू मी, मी भाग्यवंत नाही

...............................................................

No comments: