तीन गझला : डॉ. नंदकिशोर दामोधरे

 


 


१.


क्षणभराच्या वासनेला टाळ पोरी 

स्वैर झालेला पदर सांभाळ पोरी 


अडचणींचा सामना सरता सरेना 

काय सांधू फाटके आभाळ पोरी


मी तुझे करणार होतो हात पिवळे

नेमका बघ ठाकला दुष्काळ पोरी 


घे तुझे अधिकार तू समजून नंतर 

संविधानाला अगोदर चाळ पोरी


जायचे कोठे बिचाऱ्या पाखरांनी

लागल्यावर आग रानोमाळ पोरी 


कुंपणाने फस्त केली बाग जेव्हा

सांग घ्यावा मी कुणावर आळ पोरी


घे सजगतेने स्वतःची काळजी तू

भोवती टपला असावा काळ पोरी


तू सफलतेचे शिखर कर सर अगोदर

चांदण्या माथी तुझ्या मग माळ पोरी


ने मला गावात माझ्या जन्मल्या मी

गाडली जेथे असावी नाळ पोरी


हे बरे की ते बरे सांगेल नंदा

सांगणे त्याचे मनोमन पाळ पोरी


२.


फुलांचे दुःख जाणावे असा माळी कुणी नाही 

फुलावर जीव देणारे कुण्या काळी कुणी नाही 


घराचा खांब कोसळता घराचा श्वास गुदमरतो

चुलीने जाणले तेव्हा तिच्या भाळी कुणी नाही 


तुझ्या गावात आल्यावर तुला शोधून थकलो मी

म्हणाले या तुझी गल्ली तुझी आळी कुणी नाही 


गझल सांभाळण्यासाठी सुखाचे रान केले मी

मला ना वाहवा आली दिली टाळी कुणी नाही 


अनामिक मायबापाची निराश्रित लेक होते मी

कुणा सांगायची आली मला पाळी कुणी नाही


मला द्या पिंजरा सुंदर म्हणाला आतला पोपट 

बसवली पिंजऱ्याभवती नवी जाळी कुणी नाही 


चितेवर जाळणारे तर तुझे जिवलग जरी नंदा

तुला परतून येण्याची दिली हाळी कुणी नाही 


३.


खाल्ल्या मिठास येथे जागत कुणीच नाही

आता इमानदारी राखत कुणीच नाही


जो भेटला मला तो हासून हाय म्हणाला

हृदयातल्या व्यथांना सांगत कुणीच नाही

 

दुनियेस वाचल्याचे करतात फोल दावे 

गुज आपल्या मनाचे वाचत कुणीच नाही


बुडत्यास हात देणे माझा स्वभाव आहे 

केली मदत जरी मी जाणत कुणीच नाही


गावी जरी उपाशी होतो सुखात सारे

शहरात संकटाला धावत कुणीच नाही

 

संवेदना जगाच्या झाल्या बधीर नंदा

अब्रू गरीब घरची झाकत कुणीच नाही

..............................................................

No comments: