तीन गझला : रामदास घुंगटकर

 




१.


वाटेत हात कोठे, ओले करून आली 

माझी गझल कुणाचे, अश्रू पुसून आली 


शब्दांत नवरसांचा, घेऊन गोडवा अन् 

नक्षत्र दागिन्यांनी, कविता नटून आली 


कष्टातल्या जिवांना, देऊन धीर थोडा 

घामात लेखणीही, थोडी भिजून आली 


थोडा फिरून आलो, बाजार अक्षरांचा 

माझी मलाच आता, किंमत कळून आली 


अजुनी तसाच आहे, शिलबंद एक कप्पा 

का वेदना तरीही, छाती चिरून आली 


फुंकर उगी कशाला, जखमेवरी कुणाची 

झाली जुनी कधीची, आता भरून आली 


२.


स्वप्न आकाशात होते झेपण्याचे 

छाटले ते पंख उडत्या पाखराचे


मायबापाच्या नशीबी अन्न नाही 

मंदिराच्या पंगतीला नाव याचे 


तो कधी जगणार ना लाचार जीणे 

कष्ट करता राबलेले हात ज्याचे 


हारला का जिंकला चिंता कशाला 

नाव नव्हते नोंदले स्पर्धेत त्याचे 


गारव्याचा शोध घेता भाजलो मी 

स्वप्न वैशाखात पडले श्रावणाचे 


ठेवले काढून थोडे कागदावर 

भंगलेले शिल्प माझ्या काळजाचे 


३.


वळणात वाट आहे, आयुष्य चालताना 

संसार घाट आहे, आयुष्य चालताना 


बेबंद पावलांचा, घसरून तोल जातो 

वारा सुसाट आहे, आयुष्य चालताना 


रस्ते अनोळखी अन्, ही काळरात्र झाली 

अंधार दाट आहे, आयुष्य चालताना 


जीवन प्रवास नौका, संसार सागरावर

उन्मत्त लाट आहे, आयुष्य चालताना 


प्रत्येक पावलावर, गतिरोध संकटांचा 

भलताच थाट आहे, आयुष्य चालताना 


थकला जरी कितीही, अनिवार्य चालणे अन् 

रस्ता जुनाट आहे, आयुष्य चालताना

.................................................................

No comments: