तीन गझला : प्रवीण सु.चांदोरे

  




१.


सुख-दु:ख सर्व माझे, केले तिच्या हवाली

तेंव्हा कुठे गझल या, हृदयातुनी निघाली


मात्रा लगावलीचा, झालो असा दिवाना

लिहितो गझल, रुबाई, दोहे कधी कवाली


नाते तिचे नि माझे, जन्मांतरी असावे

तेव्हाच लेखणीला, नाजूक धार आली


अंधार दाटलेला, होता चहू दिशांनी

कविते तुझ्यामुळे मज, स्फूर्ती नवी मिळाली


मी फुंकले निखारे, शब्दांमधून माझ्या

देशात चळवळीच्या, मग पेटल्या मशाली


हे पंचप्राण माझे, शब्दांत ओतल्यार

मृत्यूस आडवी मग, माझीच ओळ झाली


२.


शब्द सुचता कागदावर धाव घेतो

वाचकांच्या काळजाचा ठाव घेतो


डायरीही रोज लिहितो मी इमाने

पक्षपाताचा स्वत:वर आव घेतो


कर्ज म्हणजे घोर दलदल जीवघेणी

रंक रडतो व्याज जेंव्हा साव घेतो 


सांजवेला आस धरली मी सुखाची

आसवांचा भोवरा घेराव घेतो


चूक त्याचीही असावी फार मोठी

सज्जनावर आळ जेंव्हा गाव घेतो


३ .


एकलकोंडे जगतो आपण

आनंदाला मुकतो आपण


सुसंवादही साधत नाही

इथे नेमके चुकतो आपण


माझे माझे करता करता

मातीमधे मिसळतो आपण


भोग भोगले जे चौऱ्यांशी

मुद्दाम ते विसरतो आपण


स्वर्ग, नरक ते कुणी पाहिले

इथेच दोन्ही भोगतो आपण

.....................................................

No comments: