१.
जरी झाकले हर प्रकारे उन्हाला
कुठे फार अस्तित्व असते धुक्याला
सहन होत नाहीत चटके तव्याचे
कशी चूल करते सहन कोळशाला
विठू राहतो जर घरी रोज माझ्या
निराशेत मी सांग राहू कशाला
प्रवाहाप्रमाणे पुढे जात राहू
स्विकारू बदल देह माझा म्हणाला
शिकवला धडा पाहिजे बालकांना
'ग' बाधा न व्हावी कधीही मनाला
नसे कौतुकाचे तुझे बोलणे पण
किती छान जपतोस माझ्या जगाला
नशेच्या जवळही नका जात जाऊ
सुरुंगास काडी पुरे पेटण्याला
नका भीक घालू कधीही भ्रमाला
कुठे फूल येते कधी उंबराला
तुझ्यापासुनी मी जरी दूर आहे
दिली ओढ प्रेमास सांभाळण्याला
२.
नको घर, नको पत, नको शेतसारा
तुझी साथ असणेच माझा निवारा
ठिबक, पाट, सिंचन शिवारास द्या पण
खऱ्या तृप्त करतात पाऊस धारा
तिमिर दूर करते किती शांततेने
जरी छेडतो रोज समईस वारा
म्हणे आमच्यावर किती प्रेम बाबा
जरा या उशीरा पहा येरझारा
मनावर सुगंधी कशी झिंग चढली
कुणी अत्तरावर करा ना उतारा
खुलेआम काबीज केलाय रस्ता
पहा लाल गुलमोहराचा दरारा
कशी सांग बोलू तुला भेटल्यावर
तुझे नाव घेताच येतो शहारा
३.
जराशा वाटणीने का घरोबा वेगळा होतो
धनाचा मोह सुटल्यावर मनाचाही मळा होतो
कितीही गोड बोला पण कुणाचे लक्षही नसते
सहज बोलून जाते अन् पराचा कावळा होतो
रुपावर खर्च केला पण समाधानी तरी नाही
"किती सुंदर" सखी म्हणताच हृदयी सोहळा होतो
सदोदित सज्ज कामाला तुझ्यासाठी घरीदारी
'जखम झाली पहा म्हणते' अचानक आंधळा होतो
किती मन लावुनी केली शरीराची पहा ठेवण
कुणाशी साम्य आढळते कुणी तर आगळा होतो
........................................................................

1 comment:
अतिशय सुंदर अंक प्रकाशित झाला आहे. सुंदर मुखपृष्ठ आणि सुंदर प्रकाशन. माझ्या तीन गझलांचा समाविष्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 💐🙏🙏
Post a Comment