१.
मी कधीही हार मानली नाही
'वेदना' ती भार मानली नाही
भोगले मी शाप ताप योगाने
'वासना' बेकार मानली नाही
वागलो शाबूत ताठ माथ्याने
'वंचना' आधार मानली नाही
बोललो जे साच त्यास प्राणाने
कोकिळेला घार मानली नाही
तारतम्यानेच जोखले त्याला
मी हिऱ्याला गार मानली नाही
ऐकले मी बोलणे बडेजावी
'भावना' भंगार मानली नाही
२.
येथे दबाव माझा आहे अजून बाकी
सारा लगाव माझा आहे अजून बाकी
झाला कुठे पुरे हा खेळून जा जरासा
राखीव डाव माझा आहे अजून बाकी
रागावलो परंतू पोटात प्रेम होते
भोळाच भाव माझा आहे अजून बाकी
मी शोधतो निवारा हिंडून दूर देशी
साराच गाव माझा आहे अजून बाकी
साऱ्या तुझ्या मनाच्या जागा भरून आल्या
ओलाच घाव माझा आहे अजून बाकी
................................................................
No comments:
Post a Comment