तीन गझला : जयप्रकाश सोनूरकर


 


१.

सहन होणार कोणाला जिवाच्या पार झाल्यावर

कुणीही शांत बसतो का मुळाशी वार झाल्यावर


जिव्हाळ्याचे जरी असले जवळचे शेकडो नाते

कुणी सोबत दिसत नाही जबर आजार झाल्यावर


कधी ओठातुनी पडतो नकोसा शब्द एखादा

परत घेणे जमत नाही पुन्हा उच्चार झाल्यावर


घरी येताच मावळतो पुऱ्या देहातला थकवा

हळूचच पैजनांचा त्या घरी झंकार झाल्यावर


गुन्हा होओ न होओ पण चुकीने जीव जातो ना

कुणाच्या हातचे जर का कधी हत्यार झाल्यावर


नव्याची वाहवा होते जगाची रीत आहे ही

कुणी पुसणारही नाही कधी भंगार झाल्यावर


बघा रुंदावुनी कक्षा तिला हृदयात द्या जागा

तिला घर पाहिजे असते सुरू संसार झाल्यावर


२.


पावसा ओथंबुनी तू गार कर

कोरड्या मातीस या गर्भार कर


नावलौकिक रोपटे जर पाहिजे

अंकुरावर चांगले संस्कार कर


सर्व आहे ईश्वरा त्यांच्याकडे

फक्त वृत्ती तेवढी दातार कर


जे तुला पटते तयाला साथ दे

फालतू गोष्टीस तू इन्कार कर


बंद ओठातून यावी आर्तता

याचसाठी एकदा उच्चार कर


३.


देह म्हणजे एकतारी

जिंदगी सकलास प्यारी


मोह, माया जात नाही

ईश्वरी किमयाच न्यारी


श्वास घेतो रोज उसना

केवढी झाली उधारी


प्राण देही त्रस्त आहे

आण त्या मृत्यूस दारी


पुस्तकांचा ढीग आहे

माणसे ना वाचनारी

......................................



No comments: