१.
या मनाच्या आत शिरला हेर कोणी
लक्ष बारिक ठेवतो चौफेर कोणी
लागली उचकी कुणाची सांजवेळी
मीच आहे का मनाबाहेर कोणी
लग्न झाल्यावर मुलीचा बांध फुटला
आसवांचा आणला आहेर कोणी
काल कोणी भाकरीने शांत झाला
नव्वदीचा आज धरतो फेर कोणी
उंच मजल्यांचे शहर चित्रात दिसते
झोपड्यांचा पाहिला ना घेर कोणी
मित्र दोघे तीर्थयात्रेला निघाले
द्वारका केली... पुढे अजमेर कोणी
बाभळीला आणले शब्दांत आहे
आज रक्ताळून लिहितो शेर कोणी
२.
ओंजळीतले धान्य विठ्ठला! कसे तुझ्यावर वाहू आता
घरात उरले थोडे दाणे
'पेरू की ते खाऊ आता'
गढूळ झाला दिसतो आहे डोह चंद्रभागेचा सगळा
खोल बुडवली अभंगगाथा सांग कसा मी पाहू आता
सोसल्यात मी झळा उन्हाच्या तुला भेटण्यासाठी येथे
देह सरींनी भिजवशील की मी घामाने न्हाऊ आता
पुन्हा परीक्षा पुढे सरकली पेपर फुटला परत नव्याने
गहाण पडले पुन्हा डोरले घरी कसे समजावू आता
लिहिता लिहिता सटवाईची संपत गेली बहुधा शाई
घरात बसला केतू माझ्या उंबरठ्यावर 'राहू आता'
रस्तोरस्ती वाढत आहे कॅफे हल्ली तरुणांसाठी
वाट पाहतो पुन्हा कांबळे भेटणार का शाहू आता
प्रश्नच पडला नाही त्याला पंख छाटले होते ज्याचे
या क्षितिजावर जाऊ अथवा त्या क्षितिजावर जाऊ आता
जो तो डॉक्टर बनून देतो येथे सल्ला उपचाराचा
प्रत्येकाने जखम उसवली मलम कुणाचे लावू आता
'घर ते स्मशान' शर्यत असते आयुष्याची 'प्रशांत' इथली
ठरलेले जर अंतर तर मग पुढे कशाला धावू आता
३.
पोटामध्ये जन्म घेउनी डोळ्यामध्ये आली आहे
भूक एवढी निलाजरी की ओठामध्ये आली आहे
जनगणना चालू झाल्याची गावामध्ये चर्चा आहे
मालकीण वाड्याची हल्ली गोठ्यामध्ये आली आहे
जिकडे तिकडे मरून पडली शेतामध्ये रानपाखरे
हाव अघोरी शहरांमधली पाटामध्ये आली आहे
जमीन जुमला कुणा मिळाला, कुणा मिळाले सोने नाणे
भाग्यवान तो आई ज्याच्या वाट्यामध्ये आली आहे
झाड एकटे प्रशांत होते कलकलाट वाढला अचानक
वाटत आहे नवीन चिमणी घरट्यामध्ये आली आहे
........................................................................

No comments:
Post a Comment