तीन गझला : नंदू सावंत

 




१.


मला जर त्रास झाला तर तुलाही त्रास होतो का?

कुणी स्पर्शून गेल्याचा मनाला भास होतो का?


सुखाचे घास दोनच खोपटालाही मिळाल्यावर

मलुलशा चेहऱ्यांचाही दिवस मग खास होतो का?


मनोरथ तेवढे अपुले पुरे झाले न केव्हाही

पुढे जाऊन इच्छांचा सुरू वनवास होतो का?


किती केल्या जरी डोळस जगाच्या वल्गना त्याने

मनाने पाहतो जो, तो कवी सुरदास होतो का?


कुणी काळीज त्याला जर म्हणाले अंतरामधुनी

सुखावुन काळजाचा तो मनस्वी श्वास होतो का?


कुण्या एकास कोणी जर पकडले लाच घेताना

तसा सिस्टीमचा सगळ्यात आधी ऱ्हास होतो का?


म्हणाले देव कुठला? हा कुणाला पावला नाही

अशाने पात्रतेचा त्रास मग दगडास होतो का?


कधी आई, कधी ताई, कधी भार्या, कधी मुलगी

मुक्याशा जाणिवांचा जाच त्या पदरास होतो का?


२ .


यश मिळाल्यावरी अंगठा दाखवू

डाव कुस्तीतला रांगडा दाखवू


मानहानी तहाची जरी बोचली

सत्वरी बावटा पांढरा दाखवू


राग आला जरी कळ उरी थोपवू

चेहरा मंदसा हासरा दाखवू


वर वधू मान्य लग्नास नाही कसे?

लाच म्हणुनी पुढे बोहला दाखवू


सुस्त झालास जर, तर कधी कासवा

हारलेला पुन्हा तो ससा दाखवू


आजचा माल लपवून ठेवू घरी

फ्रेश आहे म्हणुन, कालचा दाखवू


का चव्हाटा सुना गावचा आज हा

गावगप्पांतला गोडवा दाखवू


आळसावून गेलेच जर मनसुबे

ह्या मनाला सतत आरसा दाखवू


३.


फुंकर घालुन शमणारी ती वेदना जरी नाही

जखमी करण्या इतपत घातक जीभ ही तरी नाही


खडतर झाले आहे आता जीवन खेड्यांमधले 

शहरांमधली परिस्थितीही फारशी बरी नाही


चार उंबरे फिरली तेव्हा इतका गहजब झाला

कळले मग ती पारावरली बातमी खरी नाही


वणवण फिरलो विचारीत मी तिच्या घराचा पत्ता

मला समजले तिची न माझी आठवण घरी नाही


एक चहाचा कपही तेव्हा देत टवटवी होता

आज कशाने मनास तितकी येत तरतरी नाही


जसा पाहिला वारकरी मी तिष्ठत रांगेमध्ये

हृदयी जपलेला मी, हा तो सावळा हरी नाही


दहा भुकेली तोंडे आणिक एक कमाई होती

शिवी मिळाली पण पोटाला शिळी भाकरी नाही

.................................................................



.

No comments: