तीन गझला : सरिता प्रशांत गोखले

 



१.


संघर्ष खूप केला, हरले कधीच नाही 

आव्हान पेलताना, थकले कधीच नाही


तू पेरलेस कायम संस्कार ह्या मुळाशी

त्याच्यामुळेच बाबा खचले कधीच नाही...


एकेक स्वप्न तुमच्या खांद्यावरून दिसले

निपचीत पायथ्याशी पडले कधीच नाही 


मी गाठले कधीचे बघ ध्येय एकटीने

स्पर्धेत जीवनाच्या अडले कधीच नाही

 

तुमच्यामुळेच बाबा विश्वास ठाम आहे 

दैवास फाटके मी म्हणले कधीच नाही

 

प्रत्येक पावलावर आहेस सोबतीला 

वय वाढले तरीही बसले कधीच नाही 


जपतो तुझ्या कळीला संस्कार तू दिलेला

भ्रमरापुढे जराही, फुलले कधीच नाही


सांगून जात आहे स्मितगंध हा दिशांना

 बाबासमान दैवत घडले कधीच नाही 


२.


हारण्याची खंत ना रक्तात माझ्या 

मी कितीदा खोल जाऊ आत माझ्या 


प्राक्तनाशी वैर आहे फार माझे

येत नाही दुःखही परिघात माझ्या


काळजाचे सर्व कप्पे रिक्त झाले

राहिली स्वप्ने कुठे विश्वात माझ्या 


भेटला कोणी धनी शब्दातला तर 

ठेवते मी त्यासही लक्षात माझ्या


जिंदगी उध्वस्त झाली का म्हणू मी 

ठेवले देवास मी असण्यात माझ्या 


३.


कुणीच नसते जगात अपुले म्हणण्यासाठी

उघड मनाचे दार तुला हे कळण्यासाठी


फुले सुगंधी मला अखेरी किती मिळाली

तुम्ही पेरले असंख्य काटे सलण्यासाठी


कशास इतके सहन करू मी लढेन म्हणते

उभ्या जगाने इथेच यावे झुकण्यासाठी


मिळेल जितके त्यातच मित्रा सुखी असावे

किती मिळाले, कमीच असते जगण्यासाठी


करून घे तू मनास बळकट स्वतः स्वतःच्या

मिळेल तेव्हा तुलाच शक्ती लढण्यासाठी

...............................................................

No comments: