तीन गझला : हेमंत राजाराम




१.


अचाट काही करावयाला जन्माला ना आलो 

जगावेगळे जगावयाला जन्माला ना आलो


क्षण आलेला सुखात जावा इतकी इच्छा केवळ 

हिरो जगाचा ठरावयाला जन्माला ना आलो 


माझे माझे फक्त पाहिले ह्याचे त्याचे नाही 

दुनियेचे ह्या बघावयाला जन्माला ना आलो 


छोट्या छोट्या गोष्टींनी मी स्वर्ग बनवला माझा 

नरक जिण्याचा करावयाला जन्माला ना आलो 


तसे पहाया दुनियेमध्ये असती हजार लफडी 

लफड्यामध्ये पडावयाला जन्माला ना आलो 


फक्त दिलेल्या शब्दाखातर जन्म जाळला आहे 

उगी कुणावर जळावयाला जन्माला ना आलो 


कधी जन्मलो, मरून गेलो, कळले नाही कोणा 

उभ्या जगाला कळावयाला जन्माला ना आलो 


२.


जेवढी जन्मास माझ्या लगडली आहेत स्वप्ने

तेवढी एकेक सारी भंगली आहेत स्वप्ने


मी शहाणा व्हायसाठी पाहिली उत्तुंग स्वप्ने

पण किती वेड्याप्रमाणे वागली आहेत स्वप्ने


तू नको होऊस दुःखी पाहुनी दु:स्वप्न आता

ऐक ना! माझ्याकडेही चांगली आहेत स्वप्ने


थांबला नाही कुठे तो जन्म सारा धावताना  

बेभरवशी जिंदगीला जुंपली आहेत स्वप्ने


शांत चित्ताने चितेवर प्रेत आहे झोपलेले

अन् बघा वणव्याप्रमाणे पेटली आहेत स्वप्ने 


३.


एकांताची ग्वाही आणिक आपण दोघे

दुसरे कोणी नाही आणिक आपण दोघे 


हवेत भरली तलखी इतकी सांग कशाने...

दुराव्यातली लाही आणिक आपण दोघे


कळ्या, फुले अन्  वाऱ्यामध्ये भरून वाहे

जादू दिशांत दाही आणिक आपण दोघे


कळू न देऊ जगास काही अपुल्यामधले...

क्षण अपुले हे काही आणिक आपण दोघे


वजा तुझ्यातुन तू, माझ्यातुन मी झाल्यावर

उरेल एक कथा ही आणिक आपण दोघे

.................................................................




















No comments: