तीन गझला : डॉ. शुभांगी कुलकर्णी

 



१.


नितळ व्हावे पुढे नाते म्हणुन थांबायचे आहे 

तुझ्यामाझ्यातले काहीतरी निवळायचे आहे 


तराजूखालचे काढून आता ठेवते चुंबक

मला गरजेत एखाद्या तुला तोलायचे आहे 


कशी हुसकून देऊ मी सयींची पाखरे अवखळ...

कसे सांगू? मनाचे झाड हिरवे व्हायचे आहे 


दिला ह्या जीवनातच गोडवा ओतून मी माझा...

चवीसाठी पुन्हा ते छानसे ढवळायचे आहे 


कमी केली तिने ठरवुन प्रवाहाची गती सुद्धा 

म्हणे, 'दोघांतले' अंतर तिला मिटवायचे आहे 


पसारा बांध दुःखा ऐक, अडचण व्हायच्या आधी

सुखाच्या पाहुण्यालाही घरी उतरायचे आहे


शिगोशिग घेतली भरुनी पुन्हा माझी रिती ओंजळ

मला ठाऊक होते की रिकामे जायचे आहे 


२.


भाव त्याच्या चेहर्‍यावर दाटले आहेत काही 

अन् खुबीने त्यातले मी वाचले आहेत काही


वाटले लपवून ठेवू भेटही माझी तुझी, पण...

ह्या जगाचे सुक्ष्म चष्मे सांडले आहेत काही 


केवढे सल्ले जगाने वाटले वेळीअवेळी 

घेतले काही मनावर, सोडले आहेत काही 


प्रेयसी समजून नियतीला कितीदा माफ केले 

पण तिनेही डाव कपटी मांडले आहेत काही 


राख स्वप्नांची तिने ओलीस आहे ठेवलेली...

अन् कळाले प्राण त्यातच फुंकले आहेत काही 


हाव त्यांची आमच्यापेक्षा जराशी जास्त होती 

वर्तुळातुन मित्र असले पांगले आहेत काही 


दोर नियमांचे जिथे गळफास झाले चालताना 

त्या रुढींचे कायदेही मोडले आहेत काही 


वाच्यता नव्हतीच केली वेदनेची मी कुठेही...

बोलणारे घाव का डोकावले आहेत काही 


गाळ उपसुन काढला मी जीवनाला शोधताना 

गुढ रस्ते आजही पण तुंबले आहेत काही. 

 

३.


मनाची पानगळ झाल्यावरी हमखास आठवतो

मला सोडून गेलेला तुझा मधुमास आठवतो 


कधी मी गोल घुटमळले कधी तर दूरवर गेले

मला शोधायला झाला जगाला त्रास आठवतो 


जरी दिसतेय सर्वांना शिखर काबीज केलेले....

मला दर पायरीवरचा तुझा अदमास आठवतो. 


उन्हाने त्रासलेलेही दिवस नाचायचे त्यांचे 

तिची सोबत जशी गेली... पुढे वनवास आठवतो 


विषाची घेतली नव्हती कधी कुठली परीक्षा पण...

विषाने घेतलेला जीव त्याचा खास आठवतो


जसा अंकूर गर्भातुन सहजतेने विलग केला 

तिला आतून झालेला परीचा भास आठवतो 


यशाच्या रुक्ष रस्त्यावर नकोसा जीव झालेला...

तिथे उबदार आयुष्या, तुझा सहवास आठवतो.

.......................................................................

No comments: