१.
कसा आवरू मेंदूमधला सुप्त पसारा
हलतो आहे जोवर डोक्यामधील वारा
बहुधा आता मिळेल छप्परदार निवारा
छतास पडल्या भोकामधून तुटला तारा
सूर्य ऊन की घड्याळ भरला राग कशाने
काट्यावरती काटा चढला... चढला पारा
खून, भांडणे, ट्रेन, लोहगड वाढत सुटले
उरला नाही बहुधा कोणाचाच दरारा
पुन्हा एकदा खोटे बोलायाचे आहे
कुणीतरी 'कैलास' कसा आहेस? विचारा
२.
नेस्तनाबूत व्हायच्या आधी
भेट मी भूत व्हायच्या आधी
दे सुपारी खुना वधासाठी
मी सरळसूत व्हायच्या आधी
मुंबई कर... फिरू बिरू म्हणतो
जीव ताबूत व्हायच्या आधी
फट म्हणे तोच वृद्ध झालो की
रात जागूत व्हायच्या आधी
अजनबी हो पुन्हा... नको होउस
मी अनाहूत व्हायच्या आधी
पूर्ण पाहून घ्यायचे आहे
विश्व काबूत व्हायच्या आधी
ठाम आहे विजय म्हणालेलो
मी पराभूत व्हायच्या आधी
जन्म 'कैलास'चा नको होता
फार खेडूत व्हायच्या आधी
३.
सभोवताली हवा विषारी आहे
प्राण उरातिल फक्त प्रभारी आहे
वार आपला बोथट होतो हल्ली
अन् तिकडे समशेर दुधारी आहे
नशीब माझे पुण्यात होते बहुधा
आयुष्याला झोप दुपारी आहे
पान, काथ, तंबाखू, गुटखा जमले
मला मारण्यायोग्य सुपारी आहे
जगणे तर कोलांटउड्यांतच गेले
मी माकड आयुष्य मदारी आहे
कशामुळे 'कैलास' उकडते आहे
स्मशानात पसरली पथारी आहे
...................................................

No comments:
Post a Comment