१.
उरातच दाटले वादळ तुला मी काय सांगू
कसे मी लावले काजळ तुला मी काय सांगू?
जुना आजार आहे की नवा कळलाच नाही
मनाची सोसली कळ कळ तुला मी काय सांगू?
क्षणासाठी उभी केली सुखाची कल्पना मी
सुन्या वाटेतली जळजळ तुला मी काय सांगू?
कशी विरहात आली आठवांची फौज सारी
सखी पोटातली मळमळ तुला मी काय सांगू?
हवाही गार झाली बघ उन्हाच्या सावलीशी
उरातच राहिली सळसळ तुला मी काय सांगू?
२.
सुख दुःखांना घेत कडेवर चालणे सुरू जाहले
वेळेच्या त्या कसोटीतही धावणे सुरू जाहले
रात्रंदिवसा खुळ्या मनाचे उणे भासवू लागले
बुद्धीचे मग नाव मनाशी जोडणे सुरू जाहले
खुणवत जावी उरी स्पंदने, शब्द झरावे लोचनी
जीवनाकडे रोज नव्याने पाहणे सुरू जाहले
भविष्य हे तर कल्पतरूचे झाड नसावे कोणत्या
पानोपानी इतिहासाला चाळणे सुरू जाहले
कृतज्ञतेचा अर्थ कळावा बोध जीवनी घडावा
मौनाचा मग नाद सोडुनी बोलणे सुरू जाहले
३.
परीघ अपुल्या संसाराचा बस गोल हवा
तुझ्या नि माझ्या जगण्यात अता समतोल हवा
भेटवस्तूंची गर्दी आता नको वाटते
आठवणींचा उरात साठा अनमोल हवा
शब्दातच मग मधाळलेला भाव भेटतो
बिनशब्दांचा तो क्षण सुद्धा बहुमोल हवा
नकोस सांगू ताबा सुटला वादच झाला
स्वतः स्वतःवर स्वतःचसाठी कंट्रोल हवा
एक इशारा तुझा मिळू दे बस कायमचा
तुझ्या भोवती जगण्यासाठी मज रोल हवा
...............................................................

No comments:
Post a Comment