१.
जर वाटलीच घ्यावी तर घ्या उधार दुःखे
येथे न आवडीची, कोणास फार दुःखे
कर्मात भोग नक्की, ते चांगले करावे
छळतील काय मनुजा, मग ती असार दुःखे
आभाळ संकटांचे मी पेलले कितीदा
अन् सोसली सुखाने, क्षुल्लक टुकार दुःखे
वाट्यास येत गेल्या राशी अतिव सुखांच्या
हृदयात साठलेली, झाली फरार दुःखे
कष्टातल्या सुखाचा आनंद मान "दीपी"
पाहून हास्य ओठी, झालीत ठार दुःखे
२.
तू जरा जवळी रहा आभास असल्यासारखी
हा भले बिलगू नको मज श्वास असल्यासारखी
दरवळे जो आसमंती तो तुझा शृंगार मी
चांदराती ये उराशी खास असल्यासारखी
जन्मभर मी साथ काट्यांसारखी तुजला दिली
ये फुलूनी तू तरी मधुमास असल्यासारखी
चिंतनी तू, छंदही तू, तूूच राज्ञी, स्वामिनी
रातदिन स्वप्नात येते ध्यास असल्यासारखी
तू दिल्या जखमा उरी मी केवढ्या कुरवाळल्या
राहते का दूर तू दुस्वास असल्यासारखी
३.
तू भेटशील तेव्हा हसतील काय डोळे
डोळे भरून पाहुन भरतील काय डोळे
ओठांवरीच अडले सांगायचे तुला जे
श्वासात श्वास मिळता वदतील काय डोळे
हातात हात घेता स्पर्शात भान हरपे
लाजून चूर होता झुकतील काय डोळे
तुजला मिठीत घेता अंबर कवेत भासे
स्वप्ने तुझी नि माझी बघतील काय डोळे
जपली सखे उराशी मी आठवण गुलाबी
मग आठवून भेटी छळतील काय डोळे
माझे मला न कळले हे काय चालले ते
मिटले नयन जरी त्वा कळतील काय डोळे
केवळ तुझ्याचसाठी विसरून सर्व आलो
माझ्याकडे पुन्हा ते वळतील काय डोळे
...........................................................

No comments:
Post a Comment