तीन गझला : सौ.रेखा तांबे





१.


वाळवंटात मृगजळ दिसते तहान भागत नाही 

सुरेल गाणे काही वेळा मनास भावत नाही


जन्म मरण हे उत्सव दोन्ही मानवजगती असती,

सुखदुःखाच्या पहाऱ्यातून कोणीच सुटत नाही


काळजी घेत वाटेवर जो चालत असतो सदैव

पायाखाली फुले कळ्यांना सज्जन तुडवत नाही


गुंतले फार गजलेमध्ये माझे मलाच कळले

शेरांमधून गझलियत अशी एकदम झरत नाही


अनेक दुःखे सभोवताली तरी सुखाची आशा

दुःखं बघून पळून जाणे 'रेखा'स जमत नाही


२.


पिंजऱ्यातल्या पक्ष्यांमध्ये का बदल असा झाला?

दार उघडले तरी एकही आकाशी न उडाला


पारतंत्र्यात आनंद कसा मिळतो या जीवांना?

त्यांच्या वृत्तीवर नियतीने जणू घातला घाला


आकाशी घे झेप पाखरा पंख जरा पसरवून,

कळणार तुला आनंद किती तुझ्या जीवनी आला


आता निसर्ग वाट पाहतो तुझ्या चाहुलीसाठी,

निळे आकाश साद घालते तुझ्याच उड्डाणाला


ऐक हाक तू हृदयाची अन् कर जिद्दीने उठाव

उपभोग हक्क स्वातंत्र्याचा हीच आस आम्हाला


३.


शब्द का सुचती न मजला शोधते आता,

दैव रुसले हेच कारण जाणते  आता


दैववादी राहणे पण योग्य आहे का?

ह्यात मी मंथन करावे वाटते आता


नित्य नेत्री एक सुंदर स्वप्न बाळगले

स्वप्न तुटल्याने भयंकर त्रासते आता


जीवनी ह्या सर्व काही चांगले होते

प्राक्तनाने वार केला भोगते आता


दैववादी राहणे पटले कधी नाही

तेल वाळूच्या कणांतुन काढते आता

.....................................................

2 comments:

Anonymous said...

तुझ्या कवितेतील (गझलेतील)आर्तता कळते पण त्यावर कोणाजवळच काही उत्तर मात्र मिळत नाही. आपल्या आर्ततेला स्वतः शिवाय कोणीच खऱ्या अर्थाने अनुभवू शकत नाही हेच खरे.

Anonymous said...

🙏