तीन मझला : सुभाष मोहनदास



१.


ते पावसाचे चित्र तू उचलून घे 

नंतर तुला जे पाहिजे पेरून घे 


भक्तीत झाली चूक जर केव्हातरी 

“देवा मला तू माफ कर” सांगून घे


देहास ह्या अमरत्व जर का पाहिजे

आत्मा यमाचा फक्त तू काढून घे


गाणे तुला जर पावसाचे गायचे 

त्याच्या सरींची फक्त लय समजून घे


जे सत्य आहे तेच जर सांगायचे 

शपथेवरी कोर्टात ते सांगून घे


सारीच दुनिया बावळट जर राहिली

त्यांना हुशारीचे धडे शिकवून घे


२.


जिथे ना कुणीही कुणाच्या हवाली 

तिथे राहिलो मी स्वतःच्या हवाली


नदीचा किनारा नदीला म्हणाला 

तुझा पूर कर सागराच्या हवाली 


तुला व्हायचे जर अती शूर योद्धा 

भितीला प्रथम कर यमाच्या हवाली

 

तुझ्या ना ढगाची हवा पावसाळी 

कसे शेत देऊ ढगाच्या हवाली


जुन्या पुस्तकांनाच ना आज वाली 

नवी मग करू मी कशाच्या हवाली


पुन्हा थोर संतास अवतार मिळतो 

पुन्हा देव जातील त्याच्या हवाली 


गिळू लागल्यावर नदी सागराला 

करू का परत पर्वताच्या हवाली?


३.


धरेकडून मानवा शिकून घे जरा जरा 

अनेक दुःख सोस पण फुलून घे जरा जरा


भिती तुझ्या मढ्यास जर जळायची असेल तर

मनातल्या मनात तू जळून घे जरा जरा


गझल सुरेख देखणी तरी सटीक पाहिजे  

खयाल उच्च शेर तू लिहून घे जरा जरा


खरोखरी मनातुनी फुलायचे असेल तर

सख्यातल्या कुशीत तू भिजून घे जरा जरा


रहाटगाडग्यापरी जिवास दे कलाटणी

जुन्यातुनी नव्यात तू शिरून घे जरा जरा


असेल कानगोष्ट ती नसेलही जरी खरी 

तिची खर्‍यात नोंदणी करून घे जरा जरा 


तुला तिचे वशीकरण करायचे असेल तर  

तिच्या मनास थेट तू भिडून घे जरा जरा

 ........................................................

No comments: