तीन गझला : अश्विन मोरे




 


१.


तू आणला तिच्यावर बाका प्रसंग दुनिये 

फसली बघून हरिणी आभाळरंग दुनिये 


नेऊ नको  छतावर  कापून  पंख  माझे 

डोळ्यांस फार छळतो उडता पतंग दुनिये 


बाळासमान तान्ह्या... घायाळ सूर निजला 

बसलीस वाजवत तू फुटका मृदंग दुनिये 


केलास जाच इतका गेला चुडा तळाशी 

उठले जलाशयावर हिरवे तरंग दुनिये 


गोफण, गलोल, बंदुक विकते इथे कशाला 

मी 'वाचण्यात' केले 'चिमणीस' दंग दुनिये 


ये पाहुणी घरी पण, काढून ठेव चष्मा 

दुनिया कुणाकुणाची असते भणंग दुनिये 


२.


हेतू कसा कळावा हातात गळ दिसेना

काठा, तुझा नदीला म्हातारचळ दिसेना


चष्मा असून सुद्धा मी आंधळाच आहे

ना पालवी दिसेना ना पानगळ दिसेना


रोगी हसून म्हणतो शोकांतिकेस इतके

मुर्दाघरात आलो पण इस्पितळ दिसेना


गायीपुढून न्यावे उचलून वासराला

इतके अफाट धाडस वाघाजवळ दिसेना


हसण्यावरून दिसते आहे सुखात मुलगी

हळव्या तिच्या मनाचा कोणास वळ दिसेना


झाले उगाच नाही मासे हुशार  इथले

काठाकडील पाणी त्यांना नितळ दिसेना


पणती नि सूर्य यांची झाली युती कदाचित

काळोख पोसण्याचे कारण सबळ दिसेना


३.


दरी मिटवायला शहराकडे  वस्त्या निघाल्या 

जुन्या लुगड्यातल्या बाया किती भोळ्या निघाल्या 


मुलाने ठेवला चाकू वडीलांच्या गळ्यावर 

भितीने शेवटी कुलुपाकडे चाव्या निघाल्या 


किती रेखीव वर्तुळ लागल्या काढू तव्यावर 

चुलीपुढच्या मुली निष्णात म्हाताऱ्या निघाल्या 


कणा घेऊन दरबारात गेली खुद्द  चळवळ 

परतल्यावर तिच्या हातामधे कुबड्या निघाल्या 


दिली नाही कधी ओळख जुनी नवऱ्यापुढे तू 

मला तर जन्मभर झोपेतही उचक्या निघाल्या 


दिले प्रस्ताव पडलेल्या घरांचे... घरकुलाला

बिलाच्या मंजुरीला वेगळ्या याद्या निघाल्या 


सजा भोगून अख्खी काल झालो मोकळा मी 

निवाडा आज आला - हरकती खोट्या निघाल्या.

.......................................................................

No comments: