शांताराम हिवराळे : तीन गझला

 



१.


मौनात वादळाला सोसायचे कितीदा

शब्दांत सत्य माझ्या मांडायचे कितीदा


खोट्याच वेदना ह्या खोटेच हे उमाळे

खोटेच वायदे मी मानायचे कितीदा


सार्‍याच भूलथापा मग्रूर वागती ते

टोचून बोललेले ऐकायचे कितीदा


पाहून या जगाची ही रीत आंधळी मग

अज्ञान माणसांचे झाकायचे कितीदा


अंधार दाट झाला चालू कसा पुढे मी

पायात त्राण नाही थांबायचे कितीदा


आयुष्य पेलताना भांबावलो कधी मी

हे घाव अंतरीचे मोजायचे कितीदा


सारेच थंड येथे कोणी कुणात नाही

उद्रेक भावनांचे रोखायचे कितीदा


२.


कैद झाल्या भावनेला मोल नाही

का इथे ही काळजाची ओल नाही?


रोज येथे हा पसारा वाढलेला

माणसाच्या वागण्याला तोल नाही


माणसाने सत्य आहे तेच घ्यावे

ही अपेक्षा माणसाची फोल नाही


का इथे मग सर्व काही व्यर्थ आहे?

वाजतो तो बंधुतेचा ढोल नाही


माणसाने आंधळ्याची वाट व्हावे

हीच इच्छा माणसाची खोल नाही


संकटाला झेलताना धीट व्हावे,

शूर व्हावे हा फुकाचा बोल नाही


माणसाने माणसाला प्रेम द्यावे

भावनेला ह्या कुठेही टोल नाही


३.


सुखस्वप्नांच्या भासावरती जगतो आम्ही

विश्वासाच्या नात्यावरती जगतो आम्ही


जगणे इथले तारेवरची कसरत आहे

तलवारीच्या टोकावरती जगतो आम्ही


भयाण इथले वास्तव आणिक मानववृत्ती

गुंडगिरीच्या तालावरती जगतो आम्ही


किती योजना आल्या गेल्या माहित नाही

फसव्या त्यांच्या शब्दावरती जगतो आम्ही


कसे जगावे कसे रहावे भाववाढही

अंधारातच वार्‍यावरती जगतो आम्ही


आयुष्याचा घाट चढाया अवघड आहे

धाप लागल्या श्वासावरती जगतो आम्ही


इथे विषमता क्षणाक्षणाला वाढत आहे

काटे अमुच्या रस्त्यावरती जगतो आम्ही

.........................................................

No comments: