तीन गझला : सिराज शिकलगार


 


१.


आकाश पिंजले मी ठेवा किती पहारे 

ताफा तयार केला भिडले नवीन तारे


अभिजात मातृभाषा झाली अता मराठी

प्राचीन रोपट्याला फुटले पहा धुमारे


थारा सुटींलुटींना मिळणार मात्र नाही

वाचाळ भामट्यांनो शोधा नवे निवारे


गाळून घाम केला आटापिटा जिवाचा

टप्प्यात ध्येय आले मोजू कसे शहारे


निंदक जरी म्हणाले खडतर अपार स्पर्धा

खोटे कसे ठरवले त्यांचे जुने इशारे


बाष्पीभवन व्यथांचे मेघात साठल्यावर

शिरजोर मोर झाले फुलले पुन्हा पिसारे


तडजोड एकतर्फी जाहीर आज करतो

मैत्री खुल्या मनाने आता तरी करा रे


२.


बारा महिने टिकतो कोठे पूर पावसा

कळला नाही तुला धरेचा ऊर पावसा


बिया पेरल्यावरती वैरी गायब होतो 

पुन्हा कशाला बरसतोस भरपूर पावसा


तुला वानवा पाण्याचीही असते का रे

अश्रूंसाठी इतका का आतूर पावसा


कधी विजांचा गडगडाटही खोटा ठरतो

आलो म्हणुनी जातोस कसा दूर पावसा


हरेक वर्षी तुझे ऐकतो बेचव गाणे

शेतकर्‍यांशी जुळव एकदा सूर पावसा


वाहून जाते शेती कोठे धरा कोरडी

समजत नाही तुझा आगळा नूर पावसा


मनमानी वा गैरहजेरी बिनअर्जाची

तुझे वागणे कसे करू मंजूर पावसा


३.


मौनात बंद केले मानापमान माझे

दु:खात राखले मी शाबूत भान माझे


नात्यात जाणला मी धोका लपून होता

नाही पुन्हा चुकीचे ठरले निदान माझे


कल्लोळ वंचनांचा माझा मला सरेना

लावू कसे कुणाच्या भिंतीस कान माझे


शब्दास गुंफले मी माझ्या मनाप्रमाणे

अन् गायिले खुशीने बेसूर गान माझे


मी एकटाच फिरतो बेवारशाप्रमाणे

पेठेत मात्र आहे चालू दुकान माझे


झाले बरे कुणाचे जळजळ मनात नाही

मित्रास-दुश्मनाला सल्ले समान माझे


उरले मला न आता भय एकटेपणाचे 

असतात सोबतीला निंदक किमान माझे

...........................................................

1 comment:

Anonymous said...

वाह सुंदर गझल सर तिन्ही, असतात सोबतीला निंदक किमान माझे