१.
कर मात संकटावर झेलून ऊन, वारा
अन् आण हास्य ओठी सोसून ऊन, वारा
यावी मुठीत दुनिया जर वाटते असे तर
तू एकदा तरी बघ वेचून ऊन, वारा
आयुष्य एवढेही सोपे नसे गड्यांनो
कानात हेच गेला सांगून ऊन, वारा
दुनियेस जिंकण्याची इच्छा नसेल तर मग
करणार काय सांगा येऊन ऊन, वारा
तू पोसलेस ज्यांना ते फार दूर गेले
तू एकटा निघाला घेऊन ऊन, वारा
गाथा तुझ्या यशाची ना ऐकणार कोणी
तू आणला कसा हा खेचून ऊन, वारा
घेणे कुणा न काही जर आपुल्या मनाचे
उपयोग काय त्याला देऊन ऊन, वारा
२.
तुझ्या डोळ्यांत जे पाहून आले मी
तुझ्यासाठी हसू घेऊन आले मी
नको सांगू बहाणे कोणते आता
तुला भेटावया परतून आले मी
अडविले ऐक जेव्हा मज निसर्गाने
तुझी माझी कथा सांगून आले मी
कुणी नाही कुणासाठी म्हणाले जग
जगाची बंधने तोडून आले मी
जरासा हात घे हातात माझा तू
तुझ्या प्रेमात जग सोडून आले मी
नभाने एकदा वाटे विचारावे
कशाला एवढ्या लांबून आले मी
जगाला प्रश्न पडला एवढा होता
तुझ्या हृदयात का राहून आले मी
३.
कधी रडवायचा आहे, कधी हसवायचा आहे
नवा इतिहास आयुष्या, मला घडवायचा आहे
सुखाचे स्वप्न डोळ्यांनी नव्याने पाहिले जेव्हा
किरण तो एक आशेचा, मला जगवायचा आहे
सुगंधी आणली सारी, फुले वेचून चंद्राने
इरादा वाटतो त्याचा, मला जळवायचा आहे
नको रे हात सोडू तू असा अर्ध्यात आयुष्या
मला तो बाण मृत्यूचा, जरा अडवायचा आहे
ऋतूंनो एवढे ऐका, सखा येईल जेव्हाही
फुलांनी मार्ग त्याचा तो, तुम्हा सजवायचा आहे
..........................…...........................................
No comments:
Post a Comment