१.
काळीज आज माझे, केले तुझ्या हवाली
खेळू नकोस आता, तू कोणत्याच चाली
वारस कुणी न त्याचा, कोठेच भेटला मग
आजन्म एकटा तो, त्याला कुणी न वाली
ही रोजचीच दगदग, ही रोजची कहाणी
ठरवून ठेवलेली, नशिबात या हमाली
जोडून ठेवलेली, होती बरीच नाती
वेळेत काम पडता, कामी कधी न आली
तो रोज रोज येतो, आम्हास जागवाया
होता सकाळ भास्कर, देतो धरेस लाली
पैसा असेल तर मग, नाती सभोवताली
नात्यातही अताशा, बघ चालली दलाली
२.
तुझी याद आली, सकाळी सकाळी
डुलू लागली बघ, डहाळी डहाळी
किती पाहिली मी, जगी माणसे या
वरी गौरवर्णी नि आतून काळी
किती भेटले मी, झुगारून शर्थी
मला भेटण्याची, तुझी आज पाळी
किती धर्म, जाती किती पंथ, भाषा
जगी भारताची, कथा ही निराळी
कशी आसवांना, इथे आवरू मी
किती काळजाला, तुझी याद जाळी
३.
नाते तुझे नि माझे, आहे जुने पुराणे
चल गाउया नव्याने, धुंदीत प्रीत गाणे
सोबत तुझी हवी रे, ह्या धुंद सांजवेळी
ओठांत गोड गाणी, छेडू नवे तराणे
वार्यासमान येतो, झुळकेसमान जातो
मज फार छेडते रे, येणे तुझे नि जाणे
मज भेट एकदा तू, श्वासात श्वास असता
ते रोज रोजचे ते, सांगू नको बहाणे
तोलून बोलणारे , बोलून तोलणारे
मी पाहिले जगी या, मुर्खांतले शहाणे
.....................................................

No comments:
Post a Comment