१.
दोन श्वासांच्या लयीआडून नियतीने
काय आहे ठेवले वाढून नियतीने
पाहिले आहेत मी, 'मी मी' म्हणवणारे
थुंकले गिळले किती चावून नियतीने
वेळ होती आणली इतकी भयंकर की
खायलाही लावले मागून नियतीने
अडकण्यावाचून पर्यायच कुठे होता
टाकले जाळे पुढे ठरवून नियतीने
मी जगापासून होतो उसवला गेलो
आणले धागे पुन्हा जुळवून नियतीने
जन्मभर होतो जरी लपवून ओळख मी
काढले माझे गुन्हे शोधून नियतीने
रात्र वैऱ्याची नि वाटा बंद परतीच्या
दोर सारे टाकले कापून नियतीने
उंच उडण्याची हमी देऊन पंखाना
घेतले आकाश मग काढून नियतीने
२.
चार टाक्यांनी कुठे भरणार आहे
ही जखम आयुष्यभर छळणार आहे
जीवनाच्या शर्यतीचा एक पल्ला
रोज कासव अन् ससा पळणार आहे
स्वप्न आहे पाहिले ज्या कुंचल्याचे
दुःख मी त्यानेच रंगवणार आहे
हेच समजावत स्वतःला राहिलो की
काय अपुले शेवटी उरणार आहे
वेळ झाली काजवे दिसतील आता
येथला अंधार झगमगणार आहे
चोचले आहेत सारे हे जिभेचे
चव इथे पोटास का कळणार आहे?
बंद दरवाजे गडाचे हिरकणीला
वाट ती शोधत पुढे निघणार आहे
ती चुलीला बोलली पाहून होती
जन्म बाईचा असा जळणार आहे
जा तुला जर जायचे सोडून आहे
तूच माझ्याहून हळहळणार आहे
३.
त्यांचे त्यांचे ठरले होते
तुला मला डावलले होते
करत राहिलो धावा त्यांचा
जे ना केंव्हा दिसले होते
डाव टाकला होता कोणी?
कोणी पत्ते पिसले होते?
आठवणींचा पाउस येता
डोळे क्षणात भिजले होते
खिशात होती काही नाणी
खूप चोचले उरले होते
धाप लागली आयुष्याला
काही क्षण गुदमरले होते
.......................................
No comments:
Post a Comment