शेर : सृजनाच्या प्रेरणा : गिरीश जोशी

 

.



मुळात गझल लिहिण्यासाठी शेर आयात करणे, उगाच तासंतास विचार करत बसणे, लिहिणे पुन्हा मिळवणे हे मला जमत नाही. कधी अगदी सकाळी, कधी मध्यरात्री, कधी कामात खूप व्यस्त असताना तर कधी कोणत्याही वेळी शेर सुचू शकतो. एखादी बातमी वाचली, ऐकली, पाहिली तरी ती पाहून विचार चक्र फिरायला लागतात आणि शेर सुचून जातो. रेडिओवर एखादे गाणे लागलेले असते. ते ऐकता ऐकता त्यातील भाव आपल्याशी तादात्म्य पावत असेल तरी शेर जन्मास येतो. काही शेर चटकन सुचतात तर काहींना मूर्त रूप यायला वेळ लागतो.


माणसांचे विचित्र वागणे इतके लागते की माणसांविषयी प्राणी काय विचार करत असतील असे वाटून एखाद्या शेराची निर्मिती होते.

ह्याच विचारात असताना मला,

*' एक श्वापद श्वापदाशी बोलले*

*भेटला माणूस तर लांबून जा '*

हा शेर सुचला होता. पालीचे चुकचुकणे माणसे अशुभ मानायची; पण माणसांचे विचित्र वागणे पाहून पाल काय विचार करत असावी ह्यावर लक्ष केंद्रित झाले आणि

*'चुकचुकाया लागला माणुस*

*अशुभ जातो दिवस पालीचा '*

असा शेर झाला.


आपल्या डोळ्यांना समाजातील वास्तव दिसते.

समाजातील अन्याय, विसंगती दिसली की मनाला त्रास होतो आणि याच तीव्रतेने शेर बाणासारखे बाहेर निघतात.मुलींची छेड, त्यांच्यावरचा अन्याय, त्यांना रस्त्यावर, चौकातून मिळणारी हीन वागणूक ह्याविषयी राग अनावर होतो आणि शेर जन्म घेतो.

*' कागदोपत्रीच स्त्री सबलीकरण होते*

*मुख्य चौकातून मुलगी घाबरत जाते. '*


उगाच गझलेत भर घालायची पाच किंवा सात शेर पाडायचेच असा अट्टाहास कामाचा नसतो. एखादा विचार मनात घोळत असेल परंतु त्यास योग्य रूप मिळत नसेल तेव्हा मनाची घालमेल होते. मग त्या विचारास, खयालास संस्कारित करण्याचे काम सुरू होते, विचार मंथन होते, त्यातून नवीन काहीतरी हाती लागतेच.मुळात शेर सुचला आणि लगेच उतरवला अशी घाई करावी वाटत नाही.काही मनासारखे होत नसेल तर मी थांबतो, आवडीचे काम करतो. त्यानंतर कधी ना कधी पुन्हा अडखळलेला शेर पुन्हा चांगले रूप घेऊन गझलेत विराजमान होतो.


*निरीक्षण,नोंदी घेऊन शेर सुचू शकतात.*

समुद्र सफर सुरू असताना भल्या मोठ्या जहाजाच्या डेकवर बसून सागराचे निरीक्षण केले. सागराचे आणि आपल्या व्यक्तित्वाचे काहीतरी नाते असावे असे वाटले, काय संबंध असेल दोघांत. अशा विचाराच्या चिंतनाने मला खालील शेर सुचला.

*' पाहून सागराला इतके मला समजले*

*तोही अथांग आहे मीही अथांग आहे.'*


जीवनात प्रेम मिळो न मिळो; पण योगायोगाने स्मशानात जर आपल्या बाजूला प्रेयसीची कबर आलीच तर काय होऊ शकेल असा काल्पनिक विचार सतावू लागला. प्रेयसीची कबर प्रियकराच्या बाजूला असेल तर तो काय करू शकेन ह्या विचाराने

*'ह्या स्मशानाशही स्वर्ग बनवेन मी*

*बाजूला प्रेयसीची कबर पाहिजे '*

असा शेर निर्माण झाला.


तसे पाहता मनात येणारा प्रत्येकच विचार चांगला किंवा शेरास अनुकूल नसतो. आलेल्या अनेक विचारांमधून एखादा शेर तयार होतो. अशावेळी चांगले विचार, अत्यंत चांगला विचार, साधा  विचार असे  विचारांचे विभाग केले तर शेर निर्मितीस फायदा होऊ शकतो. माझ्या मते जसे दूध, दही ह्या बेसिक गोष्टींच्या माध्यमातून ताकापासून

लोणी आणि लोण्यापासून तूप निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे अगदी तशीच शेराच्या जन्माची प्रोसेस आहे. विचाराला लोण्याप्रमाणे कढवत, कढवत शेररुपी अस्सल तूप तयार होते.


रोजच्या पाहण्यातली व्यक्ती, तिचे निरीक्षण, स्वभाव, वागणूक इत्यादींचा विचार करताना काही शेर सुचून जातात. जसे की

आईकडे काय जादू असते, कोणते औषध असते की बाळाचे सारे त्रास दूर होतात, असा विचार करताना काही खास शेर सुचून जातात.

*' फक्त स्पर्शानेच मिटते वेदना*

*माय असते आपला धन्वंतरी '*


किंवा जगातला सर्वांत श्रेष्ठ दाता कोण असे शोधत असताना आईशिवाय कोणी सापडत नाही आणि यावरच शेर सुचतो,

*' सर्व श्रेष्ठ दात्याचा विचार करताना*

*डोळ्यांसमोर आईची ओंजळ येते.'*


कधी कधी परकाया प्रवेश करून देखील शेर सुचतो. दुसऱ्याचे दुःख, दुसऱ्याची वेदना आपलीच आहे असे भासते आणि त्या व्यक्तीच्या भावनाशी आपण इतके एकरूप होतो की आपणच ती व्यक्ती आहोत असे वाटू लागते आणि ह्याच अस्वस्थेतून शेर निर्मिती होते. मी काही शेतकरी नाही; परंतु अवकाळी पावसाने, गारपिटीने शेतीचे जे नुकसान होते, ते पाहून मन उदास होते, मनाला वेदना होतात. शेर सुचतो,

*' शेत गारांमुळे विधुर झाले*

*दृश्य शेतात पांढरे होते.'*


किंवा


*' पान नव्हते, फळे, फुले नव्हती*

*फक्त झाडास कासरे होते '*


कधी कधी एखाद्या फोटोवरून देखील शेर सुचू शकतो. मागे माझ्या साडूचा आणि त्याच्या मुलाचा एक फोटो मी क्लिक केला. त्यात तो मुलाला हवेत फेकतो आणि मुलगा हात पसरून आनंदाने आकाशाकडे पाहतो. असा फोटो पाहून सुचलेला शेर इथे देतो,


*'हात पसरुन मूल झेपवते*

*बाप असतो झेलण्यासाठी..'*


*(पाउले रेंगाळण्यासाठी*

*तूच कारण थांबण्यासाठी)*


शेर कधीही सुचू शकतो. गाडी चालवताना, एका जागी बसलो असताना, झोपलो असताना, अचानक मध्यरात्री उठून एखादा शेर सुचलेल्या देखील मला आठवते, कुणाशी भांडण झाल्यावर, राग आल्यावर, एखादी घटना पाहिल्यावर, काहीतरी आठवण आल्यावर, मन सुन्न, खिन्न झाल्यावर, आनंदी झाल्यावर शेर सुचतो. शेर सुचणे ही मनाच्या तत्कालीन अस्वस्थेवर अवलंबून असणारी प्रोसेस आहे.


*चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसंन्नं*

*चित्ते विषण्णे भुवनं विषन्नं*

 संस्कृतच्या अशा सुभाषिताप्रमाणे माझी अवस्था असते. मन प्रसन्न तर शेर pleasant रूप धारण करतो, मन खिन्न असेल तर दु:खावरचा, उदासी पांघरलेला शेर जन्मास येतो..


ह्या विषयावर आणखी बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण वेळेचा अभाव आणि कामाचा व्याप ह्यामुळे इतकेच लिहू शकलो.

अशाप्रकारे मला शेर कसा सुचतो या विषयी थोडक्यात मांडले आहे.



.............................................................................





No comments: