तीन गझला : निलोफर फणीबंद शेख

 




१.


जन्म घेतल्यावर श्वासांचे पळणे आले

श्वासांमध्ये आयुष्याला धरणे आले


संघर्षाची व्याख्या जेंव्हा बोथट झाली 

वैचारिक दृष्टीकोनाचे सडणे आले 


जीवन म्हणजे नदीत ढकलुन दिल्यासारखे 

धडपडणे अन्  बुडणे आले, तरणे आले 


अपुल्या आयुष्याचे जर का माकड झाले 

दुसऱ्याच्या तालावर नाचत बसणे आले


जीव लावला एक चुकीच्या व्यक्तीवर जर 

स्मशान झालेल्या हृदयाला जपणे आले 


माझ्या आकाशातच नाही कुठला तारा 

म्हणून इच्छापूर्तीसाठी झटणे आले 


२.


देत नाही कोणतीही जात ईश्वर 

माणसाच्या नांदतो देहात ईश्वर


कोणताही धर्म नाही या भुकेचा 

पोट म्हणते भाकरी अन् भात ईश्वर


तो तुझ्या माझ्यात आहे... शोध घे तू 

माणसा, शोधू नको साच्यात ईश्वर


नेहमी होते भले त्याचेच केवळ 

शोधतो जो आपल्या कर्मात ईश्वर


रक्त आहे लाल माझे अन् तुझेही 

मग कशाला बांधतो रंगात ईश्वर


कोण म्हणतो देव असतो देवळातच

पाहते मी माय अन् बापात ईश्वर 


याचसाठी वाटते आहे निरागस 

ठेवते गझले तुझ्या शब्दात ईश्वर


३.


तुझ्यावर प्रेम करते मी, तुला माहीत नाही का 

अरे हे रोज म्हणते मी, तुला माहीत नाही का 


तुझे रुसणे, तुझे चिडणे; मला कळते - बहाणे हे

तुला पण फार जपते मी, तुला माहीत नाही का 


कशाला शोधतो आहे मला बाहेर तू आता 

तुझ्या हृदयात वसते मी, तुला माहीत नाही का


लपवण्याने लपत नाही, लपवता येतही नाही 

तुझ्या डोळ्यात दिसते मी, तुला माहीत नाही का


कधी राधा, कधी मीरा, कधी मी रुक्मिणी होउन 

तुझ्यातच कृष्ण बघते मी, तुला माहीत नाही का

.......................................................................


11 comments:

Anonymous said...

खूप सुंदर

Anonymous said...

देत नाही कोणतीही जात ईश्वर... खूपच छान

Anonymous said...

व्वा व्वा निलोफर जी तीनही गझल आवडल्या. विनय मिरासे 'अशांत'यवतमाळ

Anonymous said...

नेहमीप्रमाणे ,,,,सुंदर रचना मॅडम ...अभिनंदन

Anonymous said...

माझ्या आकाशातच नाही कुठला तारा म्हणून इच्छापूर्तीसाठी झटण े आले

Anonymous said...

अतिशय सुंदर आहे, वास्तव शी ओळख करून दाखवणारी गझल आहे

Anonymous said...

तीनही गझल सुंदर

निलोफर फणीबंद-शेख said...

मनापासून आभार 🙏

निलोफर फणीबंद-शेख said...

सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏

Anonymous said...

छान आहेत गझल मॅडम

Anonymous said...

व्वा!!!!
तीनही गजल खूप सुंदर