१.
जगाशी भांडतो आम्ही, खरे ते बोलतो आम्ही
जिथे अवमान देशाचा तिथे फटकारतो आम्ही
जुने ते सांधतो आम्ही नवेही जोडतो काही
खऱ्याची चाड नसणाऱ्या रितींना मोडतो आम्ही
कितीदा भंगली स्वप्ने, तमाने रोखल्या वाटा
प्रकाशाच्या कवडशाला बघा कवटाळतो आम्ही
विरोधाची कमी नाही विकासाची हमी नाही
यशाच्या वाटचालीला स्वतः साकारतो आम्ही
उपेक्षा जीव घेणारी कधी वाट्यास जर आली
निराशेच्या झळा टाळून आशा पेरतो आम्ही
२.
जखम खोलवर असेल तोवर जपते आहे
व्रण पडलेला मिटेल तोवर जपते आहे
बी अंकुरते, रुजते आणिक वाढत जाते
कोंब कोवळा भरेल तोवर जपते आहे
नकळत घडल्या दोघांमध्ये भेटीगाठी
मैत्र चांगले जुळेल तोवर जपते आहे
शूर पिढ्यांचा वसा लाभला या देशाला
नव्या पिढीला कळेल तोवर जपते आहे
नाते अपुले तोडुन तूही नकोस जाऊ
संयम माझा टिकेल तोवर जपते आहे
बिकट काळ हा संघर्षाचा निघून जातो
बाग सुखाची फुलेल तोवर जपते आहे
कळी डोलते बागेमध्ये आनंदाने
फूल होउनी झुलेल तोवर जपते आहे.
३.
मोडले संस्कार जेथे सांधणारी मीच होते
काचणाऱ्या बंधनांना तोडणारी मीच होते
जायचे सोडून सारे भेटलेले सांगणारे
सोडले कोणीच नाही सोडणारी मीच होते.
जातपातीच्या विरोधी धोरणेही खूप होती
कोंडणाऱ्या चौकटीला भेदणारी मीच होते
भेटलो दोघे कितीदा घेतल्या शपथा प्रितीच्या
मोडल्या होत्यास तू पण पाळणारी मीच होते
दानधर्मानेच मिळतो मोक्ष हा विश्वास इथला
ज्ञानभांडारास वाटू सांगणारी मीच होते
भांडले मी खूप होते अन् अबोला फार धरला
घे जरा समजून तूही बोलणारी मीच होते
स्वामिनी, सौदामिनी, नावाजले मोठ्या गुणांनी
त्याग, त्रासाच्या धगीने पोळणारी मीच होते
....................................................................

No comments:
Post a Comment