तीन गझला : मनाली प्रदीप कोनकर





१.


मेंढ्यांगत मी मळलेल्या वाटेवर चालत आहे

माझ्यासाठी सूर्य नवा उगवावा वाटत आहे


दलदल सारी विघ्नांची तुडवत राबत मी गेले

तेव्हा कोठे गोड फळे सौख्याची चाखत आहे


गर्दीमध्ये मोहाच्या हरवत रस्ता मी चुकले

विश्व निरागस मैत्रीचे ह्या शहरी शोधत आहे


सोडत गेले सारे जण नाही कोणी साथीला

काठी बनली अर्धांगी कायम ती सोबत आहे


शीतल असते दाहकही काटेरी दुनिया इथली

त्यातच जगणे फुलणेही माऊली शिकवत आहे


२.


छानसी जिंदगी जरी नाही

मी जिणे सोडले तरी नाही


बंधने केवढी कशी भेटू

भेटही चोरटी बरी नाही


पालथ्या घातल्या दिशा त्याने

शोधले सौख्य का घरी नाही


कोण येते जगी कुणी जाते

ह्या इथे दार, पायरी नाही


ये सरळ आत काळजामध्ये

आड येणार ओसरी नाही


३.


रेशमाची गाठ सुटणे एवढे सोपे कुठे?

प्राक्तनाचे भोग टळणे एवढे सोपे कुठे?


सासरी जातेय कन्या, दुःख की आनंद हा 

काळजाची नाळ तुटणे एवढे सोपे कुठे?


घ्यायची तर घे भरारी, मोकळे आकाश हे 

पण पिसे लावून उडणे एवढे सोपे कुठे?


खेद नाही खंत नाही ना अपेक्षा कोणती

जीवनाचा मंत्र कळणे एवढे सोपे कुठे?


संधिसाधू भोवताली नेहमी दिसती इथे

थोर साधू संत मिळणे एवढे सोपे कुठे?


पाहिजे तेव्हाच फुलले, ना ऋतूंचे ऐकले

हे असे आयुष्य जगणे एवढे सोपे कुठे?

...........................................................

No comments: