तीन गझला : सुरेश शेंडे

 




१.


हसत बाभूळ माझ्या अंतरी सांभाळली 

तिच्यासाठी व्यथा मी बोचरी सांभाळली


विषय होता लटकता पोट-पाण्याचा पुढे

अशासाठीच केवळ नोकरी सांभाळली


मला अस्सल हिरा शोधायचा होता म्हणुन 

नजर डोळ्यांत माझ्या जौहरी सांभाळली


नको शिकवू गरीबी काय असते? तू मला

ठिगळ लावून एकच बोतरी सांभाळली


विटेवर ठेव आधी माय-बापाला तुझ्या 

तुला वाटेल मग तू 'पंढरी' सांभाळली


तुला रडवायचे नव्हते कधीही त्यामुळे 

स्वतःच्या आसवांची खचदरी सांभाळली


उन्हातान्हात जगण्याची सवय आहे मला

उगीचच सावली माझ्या घरी सांभाळली


तिने तर उंबराही लांघला नाही मुळी 

जिच्यासाठी जिवाची ओसरी सांभाळली?


जिने लिहिल्यात प्रेमाने निनावी भावना

तिच्यासाठीच निव्वळ डायरी सांभाळली


गळत राहू नये अंधार... चारित्र्यामधुन

उजेडासारखी मी... पायरी सांभाळली


कधी जाऊ न शकलो याचसाठी मी पुढे 

स्वतःपुरतीच माझी शायरी सांभाळली


२.


शेवटी... हसलोच नाही दुःख याचे वाटते

मी जगुन जगलोच नाही दुःख याचे वाटते


भरदुपारी 'चांदणीला' पाहिले स्वप्नात मी 

का तरी उठलोच नाही  दुःख याचे वाटते


जिंकण्यासाठी तिला, हारायचे होते मला

आपसुक हरलोच नाही दुःख याचे वाटते


मी दया, शांती, क्षमेची घेतली शिकवण तरी 

क्रोध आवरलोच नाही दुःख याचे वाटते


देह हा काट्याकुट्यामध्येच माझा वाढला

आजवर फुललोच नाही दुःख याचे वाटते


शोधले आहे स्वतःला आजवर कित्येकदा 

हाय..! सापडलोच नाही दुःख याचे वाटते


काळजालाही स्वतःच्या ठेवले उघडून मी 

पण तिला कळलोच नाही दुःख याचे वाटते


३. 


याही जगात किंवा त्याही जगात माझी 

केली कधीच नाही मी जाहिरात माझी


घर लागले कराया चिवचिव खुशीखुशीने 

आली असेल बहुधा चिमणी घरात माझी


माती-मधेच दफना, माझ्या कलेवराला 

आगीमधेच निघुनी गेली हयात माझी


मी माणसाप्रमाणे दिसतोय ना तुम्हाला?

का पूसता तरीही, मुद्दाम जात माझी?


येतील वेदना अन् करतील  सरबराई

असणार जिंदगी मग तेव्हा सुखात माझी


मज खेडवळ म्हणाले ऐकून गडचिरोली 

चर्चा बरे निघाली शहरी पुण्यात माझी?


जेव्हा तिला समजला सच्चा सुरेश शेन्डे 

ती ठेवतेय आता प्रतिमा उरात माझी

........................................................

2 comments:

THE MAFIA PRINCESS said...

खूपच छान सर सुंदर दमदार सादरीकरण 🌹❤️

Anonymous said...

धन्यवाद सर 🙏