१.
झेलत आलो घाव व्यथेचे भेकडापरी पळलो नाही
प्रारब्धाला कळते म्हणता मी का त्याला कळलो नाही
श्रीमंतांना दर्शन आधी, पटला नाही अजब कायदा
भक्तांमध्ये भेद जिथे त्या राऊळी घुटमळलो नाही
चिंता होती चितेस माझ्या जाळू याला कैसे, कारण
दुजा यशावर भाळत गेलो पण कोणावर जळलो नाही
ज्ञानाचा भवसागर आहे तळ माझा ना मिळेल कोणा
अकलेचे मी तारे तोडत मैफिलीत खळखळलो नाही
ओरबाडले, कुस्करले नाजूक फुलांना ज्या हातांनी
पापामध्ये बरबटल्या ओंजळीत मी दरवळलो नाही
खपल्या काढून जुन्या जखमांची भीक कशास सांत्वनाची
मिरवत माझे घाव उरीचे दिवसरात्र भळभळलो नाही
खडकावरही अंकुरतो मी नामी दर्जेदार बियाणे
तू नसलेल्या श्रावणात मी इथे तिथे हिरवळलो नाही
धर्म जरी देव मानला मी, द्वेष न केला परधर्माचा
धर्मांधाचे धमन्यांमध्ये विष मिसळत
सळसळलो नाही
माणुसकीला फासत काळे हत्या केल्या नराधमाने
अशा खुन्याला देता फाशी मुळीच मी हळहळलो नाही
२ .
भीक दारी मागणे ही विठ्ठलाची चूक आहे
जाळते पोटास जी त्याने दिलेली भूक आहे
न्याय नाही, दंड नाही, दाद नाही, साद नाही
पापपुण्याचा निवाडा पूर्ण झाला मूक आहे
दर्शनासाठी दलाली लाटतो स्वार्थी पुजारी
नामदेवाची पायरी हे पाहता भावूक आहे
कीर्तनाची लाख रकमी आजही ठरते सुपारी
हर बुवा खाशी बिदागी मोजतो बिनचूक आहे
दानपेटी चोर गाभाऱ्यात आहे आज कळले
वाच्यता कोठे नको ही बातमी नाजूक आहे
अंधश्रद्धेच्या तमाने नष्ट केल्या ज्ञान ज्योती
वाट वारीची बिचारी आजही अंधूक आहे
जून ओवी अन् शिळी गाथा जरी प्रिय श्रीहरीला
सत्यवादी ही गझल पण सोवळी साजूक आहे
३.
सत्यासाठी जगणे-मरणे थापाड्याला कसे कळावे
नसे मुखवटा खरा चेहरा सोंगाड्याला कसे कळावे
ध्येय कोणते, चाल कोणती, धाव घ्यायची कुठल्या क्षितिजी
दिशा विचारा ध्रुवताऱ्याला वाटाड्याला कसे कळावे
मुलगा मरता, तिरडीचे त्या बापासाठी ओझे मोठे
हृदयावरती भार टनाचा माथाड्याला कसे कळावे
हास्य मुखी अन् दलदल हृदयी अंदाज कसा बांधावा मग
लाटेखाली छुपा भोवरा नावाड्याला कसे कळावे
झरे शोधणे काळजातले सोपे नसते सोड नाद तू
मुरूम कोठे, कातळ कोठे पाणाड्याला कसे कळावे
अपघात असे की घात तुझा नका विचारू मृत हाडांना
डाव खुनी की दैवी खेळी सांगाड्याला कसे कळावे
रद्दीमध्ये श्वास कोंडला वैभवशाली या शेरांचा
गझलांचे हे आर्त हुंदके कोनाड्याला कसे कळावे
.......................................................................

No comments:
Post a Comment