तीन गझला : दिवाकर जोशी

 



१. 


वाहतो आहे सरळ, अडवा मला 

कोरड्या मातीमधे जिरवा मला


बंद दाराआडचा कंदील मी

मारुनी फुंकर कुणी विझवा मला


तो स्वतः उतरेल शंभर पायऱ्या 

फक्त एकच पायरी चढवा मला


जन्मलो घेऊन जो लवचिकपणा 

त्याच साच्याने पुन्हा घडवा मला


रोज कुठवर मी सरळ चालायचे

एकदा देऊन जा चकवा मला


शक्य झाले तर पुन्हा उगवेन मी 

शेवटी मातीमधे रुजवा मला


ही स्थिती नाही समाधीसारखी 

गाढ निद्रेतुन कुणी उठवा मला


२.


तुझ्या मोहात पडण्याची परीक्षा द्यायची नाही 

मला आता चुकांची त्याच री ओढायची नाही


कशाला काढते आहेस माझी आठवण हल्ली 

व्यथा परतून माघारी मला आणायची नाही


किती चालायचे आपण समांतर दोन टोकांवर

अशाने आपल्यामधली दरी सांधायची नाही


उगाचच मोडुनी शिंगे कशाला जेन झी होऊ 

तुझी ए आयची भाषा मला सोसायची नाही


कितीही बांध घालू द्या किनाऱ्याला स्वतःपुरता

कुणासाठी प्रवाहाची दिशा बदलायची नाही


इथे एकाच प्रतलावर स्वतःचे वाढवा बिंदू

कुणाची रेघ थोडीही कुणी खोडायची नाही


जिचे अस्तित्वही नाही, जिला आकारही नाही 

अशी साच्यातली मूर्ती मला घडवायची नाही


३.


अशा कोणत्या साच्यामध्ये घडलो होतो

केवळ एका टिचकीने मी तुटलो होतो


'चुकून'सुद्धा कोणाला सापडलो नाही 

मी आईच्या पदरामागे लपलो होतो


तिथेच होता आसपास शेवटचा थांबा 

तिथून आपण का माघारी फिरलो होतो


मावळतीला जरा कुठे शुद्धीवर आलो 

मी मोहाच्या झाडाखाली बसलो होतो


कधीच माझे डोके मी वापरले नाही 

म्हणून त्याचा भक्त लाडका बनलो होतो


कसा अडकलो गर्तेमध्ये कळले नाही 

मी डोहाच्या निश्चलतेला भुललो होतो


खूप उशीरा मला कळाली माझी दुनिया 

इथून मागे नको तिथे मी रमलो होतो

..........................................…..............

No comments: