तीन गझला : प्रतिभा सराफ



१.


जीव लावावा असा तो मित्र आहे 

वळुन पाहावा असा तो मित्र आहे 


आज वाटे मीच राधा गोकुळाची 

कृष्ण भासावा असा तो मित्र आहे 


ते खरे वाटे मला तो बोलतो जे 

शब्द तोलावा असा तो मित्र आहे 


जीवनाचे गीत गावे सोबतीने 

सूर लागावा असा तो मित्र आहे 


गझल जन्मावी कधीही भेटता तो 

शेर उमलावा असा तो मित्र आहे


पौर्णिमेची रात्र यावी मीलनाची 

प्रहर थांबावा असा तो मित्र आहे 


स्पर्श लाभावा सदा वाटे तयाचा 

श्वास बहरावा असा तो मित्र आहे 


शोधले त्याने मला की मीच त्याला? 

शोध संपावा असा तो मित्र आहे 


गाठ बांधावीच आता प्रियकराशी 

जो पती व्हावा असा तो मित्र आहे 


२. 


तुझ्या सोबती मी... कशाला पुरावे?

कधी चालताना वळूनी पहावे


न श्वासावरीही जरा हक्क माझा 

तुला वाहिले मी... तुझ्यातच मिटावे


पहा चंद्र आला... तुला भेटण्याला

जरा सांग त्याला... सरावे दुरावे


किती वेदनेला... सहावे कळेना

मुलामा जणू की असे तू वदावे


'पुन्हा माळ गजरा'... करी आर्जवे तू

'तुला' माळले मी... मला तेच भावे


कधीही तुला मी... जरा आठवावे

कसे हास्य गाली क्षणातच फुलावे


३.


शब्द त्याचा पोळलेला

सूर पण आनंदलेला!


शेर लिहितो दादलेवा 

यार माझा पोचलेला


फार त्यांच्या मैत्रिणींनी

नेहमी बघ वेढलेला


मी कधी लिहिते कसेही

पाहिला ना त्रासलेला


चार ओळी समजुतीच्या 

सांगताना बहरलेला


'वाहवा'ची दाद घेतो

गझलरंगी रंगलेला!

......................................................



No comments: