१.
सज्जनतेला जुलमी भाषा कळली आहे
अराजकाने न्यायदेवता लुटली आहे
आश्वासन हे गाजर देते मतदारांना
त्याच्यावरती सत्ता त्यांची टिकली आहे
भ्रष्टाचारी विचारधारा वाढत आहे
या देशाची गरीब जनता पिचली आहे
गरिबी आणिक श्रीमंतीची दरी वाढता
समानतेची दिशाभूल ही ठरली आहे
राहिली कुठे निष्ठा आता नेत्यांमध्ये
सत्तेसाठी नैतिकता ही विकली आहे
पैशासाठी फारकतीची नवी कल्पना
सप्तपदीची गाठ रेशमी सुटली आहे
काय फायदा दरवाज्याचा नव्या घराला
संस्काराची बळकट चौकट तुटली आहे
२.
बघता बघता जग हे सारे बदलत गेले
संस्काराला किंमत असते विसरत गेले
जागत नाही कोणी आता वचनालाही
स्वार्थासाठी विश्वासाला फसवत गेले
वेळच नाही संवादाला कोणापाशी
नात्यांमधले प्रेमळ धागे उसवत गेले
दिली ओसरी माणुसकीने बसावयाला
पण हक्काने पाय आपले पसरत गेले
जरी घालती ऐवज नकली अंगावरती
आव आणुनी श्रीमंतीचा मिरवत गेले
तोरण नाही नसे उंबरा घरास आता
परंपरेची चौकट मोडत उधळत गेले
काय करावे असून डोळे दिसले नाही
आठवणींच्या जुन्या घड्यांना उकलत गेले
३.
जरी झाडास प्रेमाने विजा भेटून गेल्या
तरी भेटीत झाडाची मुळे जाळून गेल्या
तिला मी पाहिले होते जरी स्वप्नात माझ्या
मनाच्या वेदना साऱ्या तिथे जिंकून गेल्या
कसा प्रेमात ओलावा तुझ्या शोधून काढू
किती संवेदना माझ्या मनी गोठून गेल्या
पहातो कोरडे अश्रू तुझ्या डोळ्यात जेंव्हा
कळाल्या भावना ओल्या खऱ्या संपून गेल्या
कुठे आनंद काट्यांना कळ्या त्या लाजताना
तुझ्या प्रेमात आम्ही ना असे सांगून गेल्या
...................................................................
No comments:
Post a Comment