तीन गझला : स्नेहा शेवाळकर

 




१.


किती वाहू असा कायम तुझा मी भार आयुष्या 

कसा देऊ मनाजोगा तुला आकार आयुष्या 


कितीही पानगळ झाली जरी दाही दिशांमध्ये

मला गुलमोहराचा वाटतो आधार आयुष्या


नको सांगूस रडगाणी... तुझी आता  कुणालाही 

मिळालेले तुझ्या पदरी हसत स्वीकार आयुष्या


जरी घायाळ होते मी तुझ्या हळुवार शब्दांनी 

नको उपसूस शब्दांचे कधी हत्यार आयुष्या


करावा आज दीपोत्सव मलाही वाटले होते 

दिवे तेजाळण्यासाठी... नको अंधार आयुष्या 


हवी प्रत्येक घरट्याला जराशी ऊब मायेची

दरी नात्यांतली सांधून कर उपकार आयुष्या


गरीबांचे दिवाळे अन् दिवाळी सावकारांची 

असा उलटा कसा घडतो इथे व्यापार आयुष्या


२.


मोह मनाचा पुन्हा एकदा दूर फेकला... विषय संपला. 

दूरदेशच्या नात्यांचा मी पाश तोडला... विषय संपला


स्वार्थापायी, माणुसकीची हत्या होणे विधीत आहे

कष्टाने मी माझ्यामधला माणुस जपला, विषय संपला.


फुले सांगुनी भल्याभल्यांनी वाटेवरती खडे पेरले

जगण्यासाठी काट्यांचा मी सडा वेचला... विषय संपला


राम जानकी, लक्ष्मण किंवा भरत श्रेष्ठ हा प्रश्न जगाला.

मनात माझ्या, उर्मिले तुझा संयम पुजला... विषय संपला


चोर सोडुनी संन्याशाला होते शिक्षा, हीच प्रथा पण

माझ्यापुरता सत्याचा मी मार्ग निवडला... विषय संपला


संसाराला खेळ समजुनी खेळत जावे आनंदाने

फासे माझे, डाव परंतू, तिने जिंकला, विषय संपला.


पापक्षालनासाठी कायम कशास जावे गंगेपाशी

जीवनभर मी, सत्कर्माचा मार्ग निवडला... विषय संपला


३.


उशाखाली मऊ शय्या दिसे सुंदर 

सुखाची झोप कोठे लागते त्यावर


मनाचा स्वच्छ केला कोपरा जेव्हा 

जुना अंधार गेला आतला सत्वर 


नव्याने पालवी फुटली उद्याला जर 

स्त्रवू दे कातळाच्या आतला पाझर 


लढाई तीव्र मी दुःखासवे केली 

 तसा बहरू सुखाचा लागला मोहर 


जरी ना राहिली संवेदना आता 

उमटतो वळ उरामध्ये कसा नंतर


प्रतीक्षा संपली आहे यशाची जर 

नभामध्ये भरारी मार तू लवकर 


अपेक्षांना मनाच्या घाल तू आवर 

पहावी आपली झोळी तशी चादर

.......................................................

No comments: