१.
पावसाने वेदना साधी दिली
शासनाने तर मला फाशी दिली
संपल्यावर जीवना इंधन तुझे
जन्म म्हणतो घे तुला चावी दिली
जन्म गेला ठीगळांची नेसुनी
श्राद्ध करताना नवी साडी दिली
शिक्षणाची भूक मिटवावी कशी
रोज सर्वेचीच जर यादी दिली
शासनाने लाडकी केली बहिण
मात्र भावाला नवी झोळी दिली
कोंडवाडा गाय शोधू लागली
वासरा, तू कोणती धमकी दिली?
राहिलो असतो उपेक्षित जन्मभर
संविधानाने मला शक्ती दिली
२.
मार्ग माझा मी जसाही मोकळा केला
सोबत्यांनी ऐनवेळी अडथळा केला
कर्जबाजारी लटकला देह झाडाला
दोर, फांदी आपला गोतावळा केला
शेत रडले विठ्ठला, वारीत आल्यावर
टाळ म्हटले तू पराचा कावळा केला
घातला मांडव सुखाचा नेमका जेव्हा
काळजाच्या वेदनांनी सोहळा केला
बोहल्यावरती चढवली कोवळी चिमणी
पालकांनी कायदाही आंधळा केला
संविधाना, तू दिलेला रंग समतेचा
धर्म-जातींनीच अलगद वेगळा केला
३.
मागतो मी न्याय केवळ गैर काही मागतो का
हक्क माझे मागतो तर आज बोजा वाढतो का
जाहिरातीवर उगाचच खर्च करतो रोज लाखो
अंथरुण पाहून अपुले पाय केव्हा पसरतो का
सारखी लुटते तिजोरी भाबड्या जनमाणसांची
खुद्द चौकीदार अपुला चक्क दिवसा झोपतो का
जीवनाच्या शेवटीही व्याज सुद्धा फिटत नाही
फेडण्यातच शेत गेले देह तारण ठेवतो का
लोकशाही चालली ही दडपशाहीच्या दिशेने
संविधानाला बघूया देश माझा तारतो का
............................................................
No comments:
Post a Comment