तीन गझला : चंदना सोमाणी

 



१.


पाहिले मी माणसांचे रंग सारे बदलणारे 

वादळांशी झुंजणारे अन् किनारे बदलणारे 


या क्षणाची त्या क्षणाला साथ नाही जीवनाला 

लाभला जो क्षण सुखाचा तोच तारे बदलणारे 


भेटले कित्येक मोती सागराच्या खोल डोही

डुंबुनी हाती न आले भाग्य का रे बदलणारे 


आपले होतेच तेही आपले आहेत हेही 

कोण हे-ते भोवताली पण हकारे बदलणारे 


घोषणा उरल्या कुठे अन् लोकही गेले कुठे ते 

फक्त काही लोक उरले घोषवारे बदलणारे 


पाखरूही येत नाही जीर्ण झालेल्या वडावर 

सोबती होते खरे का ते निवारे बदलणारे 


साध्य झाले यत्न सारे बहरल्या आशा नव्या अन् 

पाहिले मी अपयशाचे हे निखारे बदलणारे 


२.


सावलीचा भार सुद्धा वाटतो आता नकोसा 

हा फुलांचा हार सुद्धा वाटतो आता नकोसा 


का जिवाला घोर लावी चांदणेही सांजवेळी 

लाघवी शृंगार सुद्धा वाटतो आता नकोसा 


ओळखीची माणसेही वागती खिल्जीप्रमाणे

पद्मिनी जोहार सुद्धा वाटतो आता नकोसा 


आळवेना रागदारी खेळ सारा प्राक्तनाचा 

नेटका संसार सुद्धा वाटतो आता नकोसा 


कोवळीशी आस माझी कोवळा संसार माझा

आर्जवी आधार सुद्धा वाटतो आता नकोसा 


मोकळा जर श्वास नाही कोरडा पान्हा कशाला 

बेगडी उपकार सुद्धा वाटतो आता नकोसा 


दुश्मनाला लाज वाटे हादरे ही भिंत जेव्हा 

नाटकी शेजार सुद्धा वाटतो आता नकोसा 


३.

करतात हे ऋतूही बघ राग राग आता

हे सूर्य, चंद्र, तारे सारे महाग आता 


एकी कुठे दिसेना, का रंग वेगळे हे

का ढंग भावनांचा झाला कजाग आता


हे हाल पाहवेना झाले किती फुलांचे 

गेले गळून सारे, सारे पराग आता 


ही आगही जळेना, विझले चिराग सारे 

येईल का उद्याला वेळीच जाग आता


ना राहिली नदीला ती ओढ सागराची 

अन् दाखवी किनारा खोटाच त्याग आता 


का रंग होत गेला बेरंग या धरेचा

रंगीत राहिला ना कुठलाच भाग आता


पाहू कसे कुण्याही दुर्दु:ख वंचितांचे 

का लावला सुखाने त्याला सुराग आता


उरला असा कितीसा हा काळ जीवनाचा 

सोडून जायचे का काशी प्रयाग आता

...............................................................

1 comment:

Anonymous said...

तिन्ही गझल खूप आवडल्या ताई… अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️