१.
विद्वानांची अवघड भाषा मला कुठे हो कळते
पण संतांची शिकवण माझ्या मनात कायम ठसते
पदरामधली कळी कोवळी नियती घेउन गेली
एक बाहुली मांडीवर मी घेउन आता बसते
बालपणी पाढे शिकताना इतके फटके खाल्ले
अजूनही ते आठवते अन् रोज परवचा म्हणते
तुझी सावली चटके देते... तिथे कशी मी थांबू
अंगणातले ऊन बरे मग... शांतपणे मी जगते
शाश्वत नाही जीवन हे पण... मोह कुठे आवरतो
कळते तेव्हा हातामध्ये वेळ कुठे हो असते
२.
कशाला द्यायचा सल्ला नकॊ त्या माणसांना
चला शिकवू गरज आहे निरागस लेकरांना
अशा नाजूक वळणावर उभी आहेस पोरी
निसरडी वाट दिसल्यावर जपावे पावलांना
नकॊ काजळ, नकॊ गजरा, नको घालूस बिंदी
नभीचा चंद्र हा नाही पटेना चांदण्यांना
वहीमधले जुने संदर्भ आठवतात अजुनी
मनाच्या आत पुरले मी अशा सुंदर क्षणांना
किती नाजूक दिसते स्त्री तरी खंबीर असते
कशी सांभाळते अलवार ती दोन्ही घरांना
३.
केसात पांढरी बट दिसली स्विकार आता
समजाव तू मनाला सरली दुपार आता
वाटून टाकला मी सारा प्रकाश माझा
अंधार प्यायला मी झाले तयार आता
बागेतल्या फुलांना जपले चिकार होते
रानातल्या फुलांचा करते विचार आता
तलवार पेलण्याची ताकत मुळीच नाही
घेऊन लेखणी मी करते प्रहार आता
रात्रीत चांदण्यांची उधळण बरीच झाली
दे चांदणे जरासे दिवसा उधार आता
.........................................................
No comments:
Post a Comment