जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाहीत. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य, चित्रकला ह्या कलेचे रूप महत्त्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे. असे क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होऊन तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यांपैकी एकातरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे सगळे कलाकाराच्या आत उर्मी रूपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो, चित्र असो, एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.
एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की, हे अमक्याने निर्माण केले, ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहीत नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे. शास्त्रीय संगीतातील महत्त्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही. याचे कारण मी वर केलेल्या वक्तव्यात आहे.
आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचच स्वर आहेत. सा रे ग ध प... सर्व स्वर शुद्ध. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पूर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वैगरे वैगरे... परंतु खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफिलीतही हा राग फार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायक सुद्धा त्याच्या वाटेला जात नाहीत. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतु खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली”तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...
भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोरकुमार, लता मंगेशकर. या रागात स्वरबद्ध केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहेत. त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भूपाळी सुद्धा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दूर करणारी आहे. भूपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय दृष्ट्या सायंकाळचा आहे. तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणेही याच रागात आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.
या वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येणाऱ्या भुपात ’रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगी’ ही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भुपात बांधला आहे. अंतऱ्यातील...काही शेर भूप रागाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लड्या,वरच्या पंचमापर्यंतची रूपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल ’नोटेशन’सह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया, विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता, मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलामअलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते. या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे ’सोने पे सुहागा...!’ असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही. यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा, तुकडे, मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला पं. दादासहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे तबल्याविषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रूपे आपल्यासमोर उभी राहतात. मला जर गझल गायन ऐकायला का आवडते? असा कोणी प्रश्न केला तर, ’गझलमध्ये काव्य, संगीत आणि ताल या तिन्हीची मजा घेता येते’ हे माझे उत्तर राहील....
या गझलचा मतला इतका सुंदर आहे की उर्दू न जाणणाराही या काव्याच्या मोहात पडेल. पंरतु पुढील शेर कु-ब-कू, दु-ब-दू अशा शब्दांनी भरल्यामुळे आमच्यासारख्या गावरान माणसाच्या टाळक्यात दाग़ शिरत नाही. फक्त गुलामअलीच लक्षात राहतो आणि भावतो. तरी पण ’आपसे तुम, तुमसे तू, होने लगी... ' हे मात्र अंतर्मनात कायम रुंजी घालत राहतात. ऐका तर ...खास गायकी अंगाने गायिलेली गझल...
रंज की जब गुफ़्तगू होने लगी
आपसे तुम,तुम से तू होने लगी
चाहिए पैगामबर दोनो तरफ
लुत्फ़ क्या जब दु-ब-दू होने लगी
मेरी रुसवाई की नौबत आ गयी
उनकी शोहरत कु-ब-कू होने लगी
ना उम्मीदी बढ गयी है इस क़दर
आरज़ू की आरजू होने लगी
अब के मिलकर देखिए क्या रंग है
फिर हमारी जुस्तजू होने लगी
दाग़ इतराते हुए फिरते है आज
शयद उनकी आबरू होने लगी
- दाग़
.
No comments:
Post a Comment