'किती जाळते जिवास ही धग कुणास सांगू?
मी माझ्या श्वासांची तगमग कुणास सांगू'
आयुष्यभर सामान्य माणसांची होणारी श्वासांची तगमग 'हो' 'नाही' च्या उंबरठ्यावर ह्या गझल संग्रहात आली आहे. मानवी भावविश्वावर सातत्याने लिखाण होत असते. शब्द बदलतात मात्र भाव कायम राहतात. शाब्दिक कसरती करून तोच तो आशय पुन्हा पुन्हा वाचकांच्या पुढ्यात येतो. मात्र सातत्याने येणाऱ्या काव्य विचारापेक्षा वेगळा विचार या संग्रहात आहे… जणू… म्हणूनच ते म्हणतात,
'कितीदा तीच चर्चा तेच ते मुद्दे
मला ना प्लीज विषयांतर हवे आहे'
'हो आणि नाहीच्या उंबरठ्यावर' मधील हे विषयांतर मराठी गझलला उंचीवर नेणारे आहे. हा संग्रह यानिमित्ताने एक नवा गझल प्रवाह घेऊन आला आहे. इंग्रजी साहित्यात एक वाक्य प्रसिद्ध आहे 'those who writes something and those who have something to write' काहीतरी लिहिणाऱ्यांपेक्षा ज्यांच्याकडे लिहिण्यासाठी काहीतरी आहे त्यांचे लिखाण वाचकांच्या विशेष पसंतीस उतरते. रुपेश देशमुख यांचा संग्रह याबाबतीत वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. त्यांनी अत्यंत जबाबदारीने लिखाण केले आहे.
'हो नाहीच्या उंबरठ्यावर' हा रुपेश देशमुख यांचा मराठी गझल संग्रह 'स्वयं प्रकाशन' यांनी प्रकाशित केला आहे. त्यांनी संग्रह ज्येष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत यांना अर्पण केला आहे. या गझल संग्रहामध्ये एकूण ८७ गझल आणि तेवढेच सुटे शेर यांचा समावेश आहे. प्रसिद्ध गझलकार चित्तरंजन भट यांची संग्रहाला पाठराखण लाभली आहे. इसवी सन २००० पासून रुपेश देशमुख गझल लेखन करत आहेत. दोन दशकाच्या प्रदीर्घ गझल साधनेचे प्रतिबिंब या संग्रहामध्ये उमटले आहे. जिज्ञासा ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती असते. प्रत्येक कवी त्याला आलेले जीवनानुभव शब्दांतून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. हे मांडताना नेमके काय मांडले आणि कसे मांडल्या गेले हे अत्यंत महत्त्वाचे असते. या मुद्द्यावर रुपेश देशमुख यांची गझल आपले वेगळेपण सिद्ध करते. त्यांची गझल वस्तुस्थितीदर्शक निष्कर्ष मांडते. त्यामुळे वाचकाला जणू त्याच्याच अव्यक्त भावना मांडल्या गेल्या आहेत अशी जाणीव या गझल वाचताना होत राहते. हे या संग्रहाचे मोठे यश म्हणावे लागेल.
या संग्रहातील अनेक शेर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिल्या गेले आहेत. तथ्ये आणि तत्त्वे या कसोटीवर ते खरे उतरतात. ते मानवी वर्तनाचा अचूक वेध घेतात… मानवी मानसिकतेला बोलके करतात,
त्यांचे पुढील दोन शेर बघा,
देह माझा एक पाउलवाट होतो
कोण इतके रोज माझ्यातून जाते ?
आणि
दिवसरात्र चालूच राहतो इथला रस्ता
मनामधे ही इतकी वर्दळ कुठून येते ?
हे दोन्ही शेर मनाच्या भावनिक गुंत्याला अचूकपणे मानतात… मनाच्या वेगवेगळ्या पैलूंना त्यांची गझल उजागर करते… त्यांचा पुढील शेर वाचा,
'करूया आजची कामे उद्याला
तसाही आज तर रविवार आहे'
हा शेर मानवाची सहज प्रवृत्ती घेऊन आला आहे. रुपेश देशमुख यांच्या गझलेत या बाबी सुचकपणे आल्यात. कोणत्याही कामात व्यक्तीची मनोभूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्टीमागे घटनेमागे व्यक्तीच्या विशिष्ट धारणा असतात. त्यांचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो.
'मी कुठे मागीतली आहे सफाई
मांडतो आहेस आपणहून बाजू'
असे शेर मानवाच्या वर्तनाचे बारकावे अचूकपणे टिपतात. जीवनात अनेकदा चढउतार येतात. ते जीवनातल्या या चढ-उताराची कल्पकतेने तुलना करतात. त्यांचा पुढील शेर वाचा,
'मनातल्या शेअर बाजारी,
बघत राहतो उलाढाल मी'
शेअर बाजार आर्थिक चढ-उतारासाठी प्रसिद्ध असतो… शेअरबाजाराचे मराठी गझलेमध्ये क्वचितच संदर्भ सापडतील… माणूस सतत विचार करत राहतो. हे विचार जेव्हा भावनिक स्वरूपाचे असतात तेव्हा मनात एकप्रकारे द्वंद्व सुरू असते. ही मानसिक प्रक्रिया त्यांच्या वरील शेरात चित्रित केली गेली आहे.
सामाजिक विषयावर मराठी गझल सशक्तपणे पुढे येत आहे. सामाजिक मुद्द्यांना हात घालताना मराठी गझल अधिक जबाबदार होताना दिसते. ती माणसाला चिंतन करायला लावते. याची प्रचिती पुढील शेरांतून येते...
'सिंहासनास त्यांच्या भूकंप जाणवावा...
ठेवा बुलंद इतका आवाज आसवांचा'
आणि
'सर्व धर्मांच्या मुळाशी वार केला पाहिजे
मानवाचा एकदा उद्धार केला पाहिजे'
माणुसकीला उंचीवर नेणारे हे शेर आहेत. अलीकडच्या काळात मराठी गझलेत अनेक नव्या प्रतिमा येत आहेत. रुपेश देशमुख यांची गझल याबाबतीत समृद्ध वाटते. त्यांचा पुढील शेर बघा,
'जरी सर्व स्वप्ने धुळीला मिळाली
तरी एक इच्छा सवाशीण होती'
'सवशीण' या शब्दाने या शेराला वेगळीच नजाकत आली आहे. त्यांचा आणखी एक शेर बघा,
'घेउनी गेलीस तू हंगाम हा
वेचतो आहे इथे सरवा तुझा'
या शेरातील 'सरवा' हा शब्द मराठी गझलेचे बदलते स्वरूप विशद करतो. पान क्र. ३० वर 'कोवळा अंधार' , पान क्र. ५० वर 'अंधार भुकेला' आणि पान क्र. ६० वर 'नवजात डोळे' अशा शब्दांनी त्या शेरांना खूप उंचीवर नेले आहे. असे या संग्रहात बरेच शेर आहेत हे संग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
या संग्रहातील शेरांना विचारांची स्वतंत्र बैठक आहे. रूपेश देशमुख यांची व्यक्त होण्याची स्वतंत्र शैली आहे. हा संग्रह वाचताना याची जाणीव अनेक ठिकाणी होते. याच धाटणीचे पुढील काही शेर वाचा…
'गर्दीमधला कुठलाही चेहरा निवड तू
प्रत्येकाच्या मागे एक झमेला असतो'
'करू कसा मी फरक मित्र अन् शत्रूंमध्ये ?
दोघांचीही हरामखोरी प्रसिद्ध आहे'
'एक म्हातारा पुन्हा झाला कमी
स्तब्धता रडणार पारावर किती'
'दुसरा कुणी कशाला दुश्मन हवा तुम्हाला?
हा जन्म हाडवैरी जर जन्मजात आहे'
अशा शेरांमुळे हा गझल संग्रह श्रीमंत झाला आहे. त्यांचे लिखाण कार्यकारण भाव सांगणारे आहे. हे लिखाण वैचारिक मंथनातून आले असल्यामुळे या संग्रहात परिपक्व विचार ताकदीने मांडले गेले आहेत. या संग्रहातील काही प्रतिमा, काही विषय ज्या पद्धतीने खयालांमध्ये चपखल बसल्या आहेत ती पद्धत नव्याने गझल लेखन करणाऱ्यांना दिशादर्शक आहे. 'अंगण' या विषयावरील पुढील उदाहरणे पहा,
'शहरामध्ये फील व्हायला नको तुला
गावामधले भरले अंगण सोबत घे'
'शहरामध्ये याला जागा कुठे मिळावी?
गावामधले अंगण घेउन फिरतो आहे'
'मॉड आहे, पण मनाने चांगली
सून म्हणते वेगळे अंगण नको'
तिन्हीही शेर एकाच विषयाचे वेगवेगळे पैलू मांडतात… या संग्रहामध्ये असे अनेक शेर तुम्हाला सापडतील. असेच काही पुढील उदाहरणे बघा,
'एक अधूरेपण देहाला खात राहते
अशी कोणती कमी तुझ्या स्पर्शात राहते'
'स्पर्श केला फक्त मी अलवारसा
बघ किती गंधाळला गजरा तुझा'
'तुझा स्पर्श आहे जणू बासरी
तुला रोज ओठांवरी ठेवतो'
वरील तिन्ही 'स्पर्श' या खयालावरचे शेर वाचून वाचणारा या संग्रहाच्या मोहात पडतो. 'स्पर्श'वरील शेर काळजाला नुसतेच स्पर्श करीत नाहीत तर आपल्या काळजाचा ताबा घेतात.
'हातामध्ये रिक्तपणाचा पेला असतो
एक उन्हाळा कायम तहानलेला असतो'
'कळले नाही एक झरा माझ्यातच होता
तहान माझी गल्लोगल्ली फिरत राहिली'
'भेटु दे ओठास पाणी, सांगतो
मग तहानेची कहाणी सांगतो'
या शेरांमधली 'तहान' गझल रसिकांची तृष्णा भागवते.. माती, रस्ता, रात्र, देह, जन्म, शहर, डोळे, आठवण, अंधार असे आणखी बरेच उदाहरणे देता येतील. यातील शेर सशक्त आशय घेऊन आले आहेत. प्रत्येक खयाल नावीन्यपूर्ण आहे.
हल्ली आयुष्य फार गतिमान झाले आहे. प्रत्येकाला कुठली ना कुठली चिंता सतावत राहते. तर कुणी स्वतःच्याच विश्वात इतका मग्न होऊन जातो की त्याला आजूबाजूला काय चालले आहे याचे जराही भान राहत नाही. माणूस गुंत्यामध्ये इतका अडकून जातो की त्याला काहीच सुचत नाही… अशा जीवघेण्या परिस्थितीचा वेध रूपेश देशमुख यांची गझल घेते...
'जिथे स्वत:ला वाचायाची फुरसत नाही...
तिथे तुझ्या ह्या अवतरणांचे काय करू मी?'
त्यांचा हा शेर आजच्या परिस्थितीचे गांभीर्य सांगण्याला पुरेसा आहे. पैशाच्या मागे लागून नकळतपणे बरंच काही मागे राहून जातं… अगदी आपलं आयुष्य सुद्धा! माणसाला जेव्हा याची जाणीव होते तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते… ही भीषणता अधोरेखित करणारा शेर बघा,
'पोपडे सारे निघाले शेवटी
रंग नात्याचा उडाला वाटते'
हा शेर आयुष्य जगताना आपण केवळ जिवंत आहोत का? हा प्रश्न आजच्या जगण्याला विचारतो. आज स्वार्थीपणा इतका वाढत चालला आहे की, कामाशिवाय कोणी कोणाशी संबंधही ठेवत नाही. आधी मन जुळले की नाते जुळायचे हल्ली नाते जोडण्यासाठी 'कारण' शोधले जाते. अशा मानसिकतेचा अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या घरावर सुद्धा पडतोच! आणि म्हणूनच की काय कामाच्या व्यापामुळे घरातील संवादही हरवत चालला आहे… याचा प्रतिध्वनी या संग्रहात उमटला आहे… याचे बोलके उदाहरण पुढील शेर आहे...
'पहाटे तू निघाला की घरी येतोस रात्रीला
जरासे थांब ना थोडे मला बोलायचे आहे.'
नात्यांमधील झालेले बदल रूपेश देशमुख यांची गझल सुचकपणे मांडते. वासनेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या विकृतीवर ती थेट बोट ठेवते.
'तुला मादी हवी असते तनासाठी
तुझ्यासाठी मनाला अंथरे बाई'
हा शेर माणसाच्या खऱ्या पुरुषार्थाला जागा करून जातो. नाते भावनिक बंध जोपासणारे असते. प्रेम ही भावना देहाची भिंत ओलांडल्याविना जाणता येत नाही.
नाते अलवार उलगडत असते. नात्यांमधील पावित्र्य जपले की जगण्याचा खरा आनंद मिळतो. प्रत्येक नात्यामध्ये तडजोड मोलाची भूमिका निभावत असते, नात्यांमध्ये समायोजनाची कला ज्याला जमते त्याला नाते यशस्वीपणे जपता येते.
'इगोपेक्षा मला माणूस प्यारा
म्हणूनच घेतली माघार आहे.'
हा शेर माणसाची सामंजस्याची भावना आणखी दृढ करतो.
'हो आणि नाहीच्या उंबरठ्यावर' मधील काही शेरांमध्ये इतर भाषेतील शब्दांचा वापर झाला आहे. शुद्ध मराठीसाठी आग्रही असणाऱ्यांना ही बाब खटकू शकते. मात्र दैनंदिन जीवनातील संवादात हे शब्द फारच सहजपणे येतात. ते जेवढ्या सहजपणे बोलल्या जातात तीच सहजता रूपेश देशमुख यांनी शेरांमध्ये जपली आहे. उदाहरणादाखल पुढील शेर बघा,
'आसवांना शेवटी गेले चरे
एक चॅप्टर क्लोज केलेले बरे'
हा शेर इतका सुंदर झाला आहे की वाचल्याबरोबर आपण त्यात गुंतून जातो. यात इंग्रजी शब्द वापरला गेला आहे वगैरे गोष्टी वाचताना सहज लक्षातही येत नाहीत. असाच एक आणखी सुंदर शेर बघा,
'टोलनाका लागतो मरणा तुझा
टॅक्स जन्माचा भरावा लागतो'
मराठी गझलेमध्ये इतर भाषेतील शब्दांचा प्रभावी वापर या बाबत 'हो आणि नाहीच्या उंबरठ्यावर' मराठी गझल क्षेत्रात नेहमी संदर्भ ग्रंथ म्हणून दखल पात्र राहील… अप टू डेट (पान क्र९४) इगो (पान क्र. २५), प्लीज (पान क्र.१५), टॅक्स टोल (पान क्र. ४० आणि ९१), मॉड (पान क्र.९२) , कर्फ्यू (पान क्र.१७) आणि इतर काही शेरांमध्ये अशा शब्दांच्या उपयोगाला भाषेच्या प्रवाहीपणाचे लक्षण म्हणून बघायला हवे असे चित्तरंजन भट यांनी ब्लॅर्ब मध्ये म्हटलेच आहे. त्यांचे हे विधान मला अतिशय महत्त्वाचे वाटते.
या संग्रहामध्ये ८७ सुटे शेर दिले आहेत. सुटे शेर एकत्रित दिल्यापेक्षा त्यांनी प्रत्येक गझलच्या खाली दिले आहेत. हा प्रयोग पुढे अनुकरण केल्या जाऊ शकतो. हल्ली गझलकार गझल संग्रहामध्ये सुटे शेर आवर्जून देत आहेत. या संग्रहात आलेले सर्व सुटे शेर सुंदर आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यापैकीच एक शेर बघा,
'सारे धडे गझलचे ते थेट देत असते
कुठलीच कार्यशाळा आयुष्य घेत नाही'
अशा सुंदर शेरांनी हा गझल संग्रह सजला आहे. याच संग्रहातील 'एक फोन कर' हा रदीफ असलेल्या गझलचा म्युझिकल व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष गाजला होता. याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. या संग्रहातील जवळजवळ १२ रचनेत केवळ चारच शेर आले आहेत. ५ शेरांच्या गझलेचा अट्टाहास करून गुणात्मक ऐवजी संख्यात्मक लिहणाऱ्यांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. गझलेत दर्जा महत्त्वाचा आहे. गझल किती लिहिल्यात यापेक्षा गझला गुणात्मक दृष्टीने कशा आहेत हे महत्त्वाचे असते. त्यांचा पुढील शेर बघा,
'अंतरंगी दरवळावा लागतो
शेर जगण्यातून यावा लागतो'
तुमचे जगणे प्रामाणिक असले की त्याचे प्रतिबिंब तुमच्या लिखाणात आपोआपच उतरते. अस्सल शेर जगण्यातून येतो. त्यामुळे गझलेचे केवळ तंत्र वा वृत्त समजून भागत नाही. तुम्हाला गझलेची वृत्ती समजून घ्यावीच लागते.
'हो नाहीच्या उंबरठ्यावर' हा गझल संग्रह भौगोलिक वा इतर प्रकारे चाकोरीबद्ध नाही. जात, धर्म, भाषा वा प्रांतिकवाद याला तो थारा देत नाही. ह्या संग्रहात मनाशी संवाद साधण्याचे सामर्थ्य आहे. त्यांचा पुढील शेर बघा
'पोटासाठी कोकण सोडुन शहरी झालो
तरी जिभेवर रसाळ हापुस जिवंत आहे'
रूपेश देशमुख यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी विदर्भाची, मात्र तरीही त्यांच्या गझलने भौगोलिक सीमा ओलांडून वैश्विक विचार मराठी साहित्याला दिला. वरील शेरातून विदर्भातील गझलकार कोकणातील व्यथा वेदना आणि भावना जाणून त्या प्रभावीपणे मांडत असेल तर मराठी गझलेला आणखी काय पाहिजे? माणूस कुठला आहे हे महत्त्वाचे नसून 'माणूस' महत्त्वाचा आहे. हे 'हो नाहीच्या उंबरठ्यावर' हा गझल संग्रह अधोरेखित करत आहे. एका दुर्धर आजाराने त्यांचे ३० जुलै रोजी निधन झाले. गझल चळवळीकरिता त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील.
रुपेश देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
---------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment