१.
रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो
पाहिजे आहे मनाला शांतता
एवढाही वाद आता टाळतो
मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो
श्वापदांची साथ परवडते मला
माणसांचा नाद आता टाळतो
एक फसवा भास असतो फक्त तो
भाबडा प्रतिसाद आता टाळतो
२.
केवढा जाळ झाला मनाचा
त्रास झाला मला बंधनाचा
श्वास झाला तुझा सुगंधी
श्वास माझा सखे चंदनाचा
गंध द्यावा फुलांनी घनाला
रंग घ्यावा फुलांनी घनाचा
काय कर्तव्य आहे मनाशी
पूल आहे तनाशी तनाचा
ज्यावरी प्रेम तो दूर जातो
अर्थ आहे असा जीवनाचा
३.
सुंदर वळणे पाहत पाहत आलो
मधेच थोडे थांबत थांबत आलो
फुलांऐवजी पदरामध्ये अश्रू
नियतीला मी प्रश्न विचारत आलो
मला स्वतःची ओळख पटली आहे
आरशास कायमचा टाळत आलो
आयुष्याला शिस्त लागली आहे
ऋतूंप्रमाणे मीही वागत आलो
तिचा दुरावा नरकयातना केवळ
स्वप्नामध्ये स्वर्ग उभारत आलो
...................................................

No comments:
Post a Comment