१.
यौवनाने भारलेल्या, त्या क्षणाची याद येते
भावनेने गुंतलेल्या, त्या दिलाची याद येते
पाहते मी भोवताली, लग्न संस्था मोडताना
राम-सीतेच्या अनोख्या, बंधनाची याद येते
दुश्मनांचे डाव स्वार्थी, कष्ट देती काळजाला
भाववेड्या या मनाला, ईश्वराची याद येते
धर्मभोळ्या भावनांनी, माजते काहूर जेव्हा
देश माता मानणाऱ्या, सैनिकाची याद येते
'जात' नाही जात त्यांची, रक्त येथे सांडताना
माणसाला जोडणाऱ्या, ज्योतिबाची याद येते
२.
गाळून आसवांना, स्वप्नास जाळते मी
पुष्पास आठवाच्या, केसांत माळते मी
तो रोजचेच गातो, का वेगळे तराणे
एकेक स्नेहधागा, हलकेच गाळते मी
माझ्यात दोष सारे, त्याला जरी दिसावे
पाहून आरशाला, छायेस भाळते मी
कित्येक वादळांना, नेत्रांत साठवूनी
आणून हास्य ओठी, दृष्टीस टाळते मी
भेटीत गोडवा ना , विरहात दुःख भारी
प्रेमात यामुळेही, मौनास पाळते मी
३.
फुलाने अताशा, असेही जगावे
मुक्या वेदनांना, उराशी जपावे
इथे कोण आहे, तुझ्या सोबतीला
धरी आस खोटी, उगा का कुढावे
मनाची मनाशी, जरी झुंज चाले
मुक्या आसवांनी, मुक्याने ढळावे
असूया कशाची, मला ही कळेना
धरा हीच माता, कुणा ना कळावे
असे दैव जर का, सदा संगतीला
विपत्तीस आता, वृथा घाबरावे
किती गोड भासे, शशी अंतराळी
सखी चांदणीने, समीपी दिसावे
जरी मानवाला, असे ज्ञान सारे
वने तोडुनी का, निसर्गा छळावे
........................................................

No comments:
Post a Comment