१.
दरी नात्यातली हट्टी हळू बुजवायची आहे
निखळलेली जरा दिसते कडी जोडायची आहे
सुकाणू आपल्या हाती असावा ठेव ध्यानी हे
दिशा जाणून काळाची पिढी घडवायची आहे
कधी बनशील तू कणखर मला हे सांग ना नारी
सहन अन्याय करणारी छबी बदलायची आहे
मिळाले तोकडे शिक्षण असे का वाटते आहे
शिकवली ना कधीही ती धुरा पेलायची आहे
सुसंस्कारी विचारांची गरज होती गरज आहे
नव्याने अंगणी सोज्वळ तुळस सजवायची आहे
गझल हळवी तरी भेदक तिची प्रेमातली भाषा
मनाला स्पर्श करणारी विधा मांडायची आहे
तळागाळात लपलेली क्षुधा मिटवायची आहे
खऱ्या संपन्न राष्ट्राची घडी बसवायची आहे
२.
'जरा' तरीही मनात जागा वसंत आहे
फुलावयाची अतीव इच्छा जिवंत आहे
बनून जोगी सदा घराचे भलेच केले
सदैव बाबा घराकरीता महंत आहे
दिमाख त्याचा ऋतूंत खासा असाच असतो
म्हणून बहुधा वसंत इथला सुमंत आहे
सदैव त्याच्या महान त्यागामधून ठसतो
मरूनसुद्धा जवान उरतो दिगंत आहे
तुझी दयाळा असीम रूपे अनंग काया
असेच नामाभिधान चपखल अनंत आहे
मनात स्वप्ने भरून जातो पुढेच त्याला
उडावयाला खुणावते आसमंत आहे
घबाड हे की मला मिळाली अपार माया
खरीखुरी या जगात मी भाग्यवंत आहे
३.
खोट्या खोट्या दानाचे अवडंबर आहे
मतदाराला दाखवलेले गाजर आहे
फक्त चांगले निवडावे हे सोपे नाही
भल्याबुऱ्याचा एकत्रच जर वावर आहे
जीवन म्हणजे धडपडणे रोज नवी चिंता
खरा संपतो मरणाने हा संगर आहे
भूक भागते कोंड्याने निजण्याला धोंडा
कष्टकऱ्याचे घर भूमी छत अंबर आहे
पोट रिकामे भरल्यावर शिकण्याचे सुचते
दुनियाभरचे शहाणपण त्यानंतर आहे
बापच असतो पोशिंदा कर पूजा त्याची
घरच्यांसाठी तोच खरा विश्वंभर आहे
मुलगी शिकते घरासही ती दिशा दावते
सुधारणांचे आले हे मन्वंतर आहे
..........................................................
1 comment:
Post a Comment