तीन गझला : अभिजीत दाते

 




१.


ही जगाची मांडणी होती म्हणे

मी दगड ती चांदणी होती म्हणे


घेतला होता गुलाबी फास तू .

ती कुणाची ओढणी होती म्हणे


लागलो होतो सहज जिंकायला

ही तुझी हुलकावणी होती म्हणे


आळ कचऱ्यावर कसा आला पुन्हा

एक भिजली पापणी होती म्हणे


पीक नव्हते जेवढे शेतामधे

तेवढी बुजगावणी होती म्हणे


त्याच हातांनी फुगवलेला फुगा

त्याच हाती टाचणी होती म्हणे


शेवटी ‘चवदार’ झाली जिंदगी

वेदनेची फोडणी होती म्हणे


२.

 

आयुष्याला सूर वेगळा मागितला

आयुष्याने काळ कोवळा मागितला


मलाच होते अडकवायला आले ते

मलाच त्यांनी चक्क सापळा मागितला


म्हणून जिंकू शकलो आहे शर्यत मी

दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा मागितला


सगळ्या इच्छा कुठे पुरे होणार इथे

जाण्याआधी एक कावळा मागितला


जमते आहे म्हणून इतके दोघांचे

मी हुशार अन् तिने वेंधळा मागितला


बाटत असतो क्षणाक्षणाला आत्मा तो

ज्याने होता जन्म सोवळा मागितला


कपडे, खाऊ, खेळणी खरेदी केली

पण लेकाने वेळ मोकळा मागितला


३.


कुठे जायचे कसे कळावे नीट मला?

बिनपत्त्याचे केले जर पाकीट मला


उतरायाचे ठिकाण आले आहे अन्

मिळते आहे आता विंडो सीट मला


हिशोब, कविता, फुलिगोळ्याच्या आठवणी

पुन्हा प्रवासी करते एक तिकीट मला


पुडा फोडलेला हल्ली चालत नाही

चालत होते अर्धेही बिस्कीट मला


माहित आहे लागत नाही तो नंबर 

पण करताही नाही येत डिलीट मला

.....................................................

No comments: