१.
डोहात कुणी एकांती बुडवायचे मला
एकदा तरी काचेसम तडकायचे मला
याचमुळे मी दार घराचे बंद ठेवले
कधीच नव्हते पुन्हा घरी परतायचे मला
सुरकुतलेल्या *चेहऱ्यावरच्या* आदिम रेषा
कुण्या युगांच्या गोष्टींना सुचवायचे मला
मौनावरची कात उदासी टाकायाची
अन् क्षितिजावर कुणीतरी खुणवायचे मला
इंद्रधनूच्या पल्याडचे तू ओठ मला दे
रंगामध्ये गूढ अशा रंगायचे मला
नको त्याच मी रस्त्यावरती चालत आहे
नको तेथल्या मुक्कामावर जायचे मला
२.
ती दूरवरच्या मृगजळी स्वप्ने तिची सांभाळते
एका तुझ्या हाकेजवळ ती सारखी रेंगाळते
असते तिच्यासाठी जरी ती आत्महत्या शेवटी
जाळून घेताना तरी पणती कुठे किंचाळते
घेता मिठी एकांत रात्री बिलगुनी वाऱ्यापरी
ओठांतले गाणे पुढे ओठांमुळे रक्ताळते
पोषक तिच्या गर्भातली माती नव्याने व्हायला
धरती पुन्हा कित्येकदा देहातुनी भेगाळते
आम्ही प्रवाहाने नदीच्या वेगळे झाल्यावरी
सांगू कशी जन्मास्थळी आई किती पान्हाळते
३.
जवळ फुटका आरसा सांभाळला
मी जसा तुटलो, तसा सांभाळला!
गरज होती विस्तवाची शेवटी
ओंजळीतच कोळसा सांभाळला
याद आली की तुझी घोटाळतो
काळ प्रेमाचा असा सांभाळला
जाहलो विस्तीर्ण कारण की तुझ्या
मी वडाचा वारसा सांभाळला
संपल्या प्रेमातल्या खाणाखुणा
का तरी ओठी ठसा सांभाळला
मोडता येणार नाही यार हो
मी जगाचा भरवसा सांभाळला
मी व्यथा सांभाळली गर्भातली
मी जुना माझा वसा सांभाळला
.....................................................
.
No comments:
Post a Comment