१.
या जगाचे बघा टोमणे
सारखे तेच ते बोलणे
अर्थ याला तरी काय हो?
जे नको तेच ते सांगणे
घाबरेना कुणी ज्यास ते
जाहलो तेच बुजगावणे
सांगतो लाख वेळा तरी
मान्य त्यांना कुठे ऐकणे
पावसाळा न झाला सुरू
जाहले रे सुरू तुंबणे
फक्त त्यालाच हे साधते
वेळ मोक्यावरी साधणे
आज पाहू जरा विठ्ठला
रूप त्याचे किती देखणे
२.
आयुष्याचे कोडे थोडे सुटले होते
लोक जीवावर जेव्हा माझ्या उठले होते
दाहकता या सरणापेक्षा त्यांची होती
जिवंत असता ज्यांनी मजला लुटले होते
कौतुक साधे कधीच कोणी केले नाही
साधा आणिक भला असे पुटपुटले होते
मज भेटाया येणाऱ्यांची गर्दी झाली
कुणास ठाउक लोक तरी कुठकुठले होते
शोध अता मी घेतो आहे त्याच क्षणांचा
'दिवाकराचे' नशीब जेव्हा फुटले होते
३.
ओळखपाळख हवी कशाला चला मारुया गप्पा आपण,
जातपात, वय अन् धर्माचा ओलांडूया टप्पा आपण
भाउबंदकी, हेवेदावे आणि वाटण्या खूप पाहिल्या,
हृदयामध्ये चल प्रेमाचा एक ठेवूया कप्पा आपण
विसरुन गेलो संस्कृतीसही नावे सुद्धा बदलुन गेली,
दादा, बाबा म्हणायचो अन् म्हणू लागलो पप्पा आपण
हरवुन गेला प्रेम जिव्हाळा ओल न उरली नात्यांमध्ये,
चला बघूया इथेच होते शोधू चप्पा चप्पा आपण
एकजुटीने ठरवू आता आणि जपूया माणुसकीला,
विश्वबंधुता आणिक शांती यावर मारू ठप्पा आपण
.........................................................................
No comments:
Post a Comment