तीन गझला : डॉ. विद्या देशपांडे

 



१.


तो निघाला सूर छेडत एकतारीचे 

सोंग त्याने आणले बघ थेट वारीचे


जीव इवलासा तरी त्याची मदत झाली

 रामचंद्रांना समजले प्रेम खारीचे


शोध अन्नाचा नभातुन घेत आहे ती

लागते पिल्लांकडे का चित्त घारीचे


ऐनवेळी मित्र माझा धावुनी आला

जाणले मी त्या क्षणाला मोल यारीचे


चालते दुनिया जिच्या वात्सल्य त्यागावर

या जगाला का कळेना मूल्य नारीचे


आडकाठी आणती जे विघ्न संतोषी

तेच स्वार्थी जाण शुक्राचार्य झारीचे


योग शक्ती, स्थिर मनाने भोगली शिक्षा

सोसले सावरकरांनी क्रौर्य बारीचे


चोर येता ते त्वरेने धावुनी जाते

भुंकते ना मालकावर श्वान दारीचे

 

छान तू करतेस उपमा भेळ सामोसा 

का प्रयोजन आज आहे टोस्ट खारीचे


२.


सूर्य शिरावर घेऊन पळस जागोजागी फुलले 

आयुष्याच्या उन्हाळ्यातही बहर मनाचे जपले

 

कधीतरी मन रिक्त करावे असे वाटले होते

शब्द अनावर अंतरातले कंठापाशी अडले


सोबत होते नावाला पण  फिकीर नव्हती माझी

काय वेदना सोसत गेले कोणाला ना कळले


एक कवडसा उधळत गेला प्रकाशकण तेजाचे 

निराशलेले जीवन माझे क्षणिक सुखाने भरले


आयुष्याच्या गणिताचा ना मेळ कधीही बसला 

तुझ्या नि माझ्या कथा व्यथांचे हिशेब काही चुकले


३.


विस्कटलेले दिसते आहे कुंकू काजळ 

खदखदणारे सोसत आहे उरात वादळ


अभ्यासाविण प्रगट न व्हावे कुठे कधीही

कष्ट घेउनी ज्ञान तुझे मग खुशाल पाजळ


किती ठोकरा खाल्ल्या मी जगताना जीवन 

चरे सोसले जरी असे मन कठीण कातळ


पाउस झाला खोटा, झाला पैसा मोठा 

नात्यागोत्यांमधील झाली माया पातळ


कळा सोसुनी आईपणाचे दुःख झेलते

सौख्य लाभते हुंगत जाता कुरळे जावळ


थकून गेला आग ओकुनी हतप्रभ भास्कर

झालास वृद्ध सूर्या आता सुखात मावळ

.............................................................


No comments: