तीन गझला : सुरेन्द्र टिपरे






१.


तुला वाटते तशी फालतू बडबड नाही 

खरे सांगतो जगणे इतके अवघड नाही 


कसे म्हणावे रम्य बालपण उगाच त्याला 

खेळामध्ये ज्याच्या काही पडझड नाही 


काय म्हणावे तारुण्याला तुझ्या गडे मी 

हवे तुला ते साध्य कराया धडपड नाही 


वृद्धपणा हा अनुभूतींचे असे बाचके 

तुला वाटते तितके ओझे अवजड नाही 


श्वासांचेही येणे जाणे अता थांबते 

निवांत आता हृदयाचीही धडधड नाही 


२.


ही गझल नव्हे रे नुसता वैचारिक जागर आहे 

प्रतिभांचा, प्रतिमांचा बघ हा सुरम्य वावर आहे


हे पिझ्झा बर्गर नाही वा कुठले मादक सरबत

जी तृप्त करी आत्म्याला ही ती बघ भाकर आहे


सेवा करून घेते ती अन् सेवाही करते ती

ती कठोर मालक आहे ती विनम्र चाकर आहे


गंभीर कधी ती होते वा आनंदाने नाचे

ती हास्य असे ओठांचे डोळ्यांचा पाझर आहे


प्रासाद असे शब्दांचा, अर्थांचा आरस्पानी

जरतारी शब्दांचा हा बघ सुरेख वापर आहे


३.


भग्न जाहल्या स्वप्नांचे मी चिंतन करतो

वठून गेला वृक्ष तरीही सिंचन करतो


धूसर होते जेव्हा जेव्हा तीची प्रतिमा

डोळ्यांसाठी अश्रूंचे मी अंजन करतो


असेल बसली मला आठवत तीही तेथे

स्वतःस सांगुन खोटे मी मन रंजन करतो


गंधित होते येते लाली  गालावरती

कशी सांग गं रंगीत जादू साजन करतो


वाऱ्याचेही  गाणे तेव्हा गंधित होते

निळासावळा तुझ्याभोवती गुंजन करतो


किती दाटले भय हे आहे मनात माझ्या

शेंदुर्लेल्या दगडालाही वंदन करतो


नको बघू तू वळून राधे कृष्णाला त्या 

समीप येता कान्हा दृष्टी बंधन करतो


तुझा राहिला धाक न काही आता बाई

किती उपाद्या तुझा देवकी नंदन करतो


तुझ्या मुळे रे अर्थ लाभतो गझलांना या

तुम्हांस आदरपूर्वक रसिका वंदन करतो

.............................................................

1 comment:

Anonymous said...

सर्वांग सुंदर अंक... मनःपूर्वक धन्यवाद 🙏