१.
हीच मजला खंत आहे जीवनाला अंत आहे
आणि हाती आज माझ्या श्वास तंतोतंत आहे
प्रश्न होता फक्त साधा भाविकांच्या भावनेचा
मंदिरीही चोर सारे ना तिथेही संत आहे
राज्यकर्ते शासनाचे टिंगली करती युवांच्या
ज्ञानहिन आहे युवा तर कोण प्रज्ञावंत आहे
काळजीची बाब नाही काय अन् जगलो कसा मी
बापुडे जगती मराया हीच माझी खंत आहे
एवढ्याशा फुंकरीने ही जखम भरणार नाही
वर्मस्थानी लागलेला जीवघेणा दंत आहे
तू दरोडा टाक माझ्या मिळकतीवर एकदाचा
ने लुटुन आयुष्य माझे
मी तरी श्रीमंत आहे
कोण शिंतोडे उडवतो, आज माझ्या कापडावर
मीच ग्वाही देत आहे मी पुरा शिलवंत आहे
२.
सोडून स्वप्न माझे मी वास्तवात आलो
विसरून प्रांत माझा तुमच्या जगात आलो
छोट्या घरात सारे डोळ्यांत बंद होते
मोठ्या घरात येता बघ आसवात आलो
आयुष्यभर भटकलो शोधात जीवनाच्या
मृत्यू पुकारता मज एका क्षणात आलो
घेईन जन्म माझा छान्नव कुळात पुढचा
ठरवून हे मनाशी तुमच्या कुळात आलो
आधार सावलीचा ना भावला मनाला
सोडून सावलीला ग्रिष्मागरात आलो
पाहू नये कुणीही डोळ्यातल्या झऱ्यांना
जाणून जीवनाच्या मी पावसात आलो
जगणे मला असंभव विसरून यार माझे
मित्रांसवे रमाया त्यांच्या फडात आलो
३.
गेलेत क्षण सुखाचे सारे निघून आता
अन् पालवी दुखाची आली फुटून आता
भरधाव धावणारा रस्ताच थांबल्यावर
येणार सांग कोठुन वर्दळ उठून आता?
पेल्यात जीव भरला प्राशून घ्यावयाला
सांडून अर्क गेला आणू कुठून आता
सागर तुडुंब भरला आहे तिथे जलाने
मारून घेत जातो डुबकी बुडून आता
कंठात प्राण येता जाईल मी निघोनी
रडणार का कशाला कोणी उठून आता
होते भरून तेव्हा घरटे पहा पिलांनी
येणार का परत ती तेथे चुकून आता?
दमछाक खूप झाली संसार पोसताना
हा जीव मानवी बघ गेला थकून आता
.....................................................
No comments:
Post a Comment