१.
नको स्वप्न पाहू...खुळा भास पुष्पा
धरू वास्तवाचा खरा ध्यास पुष्पा
तुझ्या आठवांचे थवे सोबतीला
हवे कोण आता सहाऱ्यास पुष्पा?
मिळाली न ज्यांची जरा सावलीही
उभे तेच माझ्या निवाऱ्यास पुष्पा
दिली वादळांनी दिशा चालण्याची
अता काय भीती प्रवासास पुष्पा
तुला सावरू की तुझ्या या मनाला
नको वेड लावू विचारास पुष्पा.
२.
आयुष्याच्या वळणावरती भेटू आपण पुन्हा एकदा
तुझ्या न माझ्या प्रेमावरती बोलू आपण पुन्हा एकदा
नकोच ठेवू मनात काही आता नच हे रुसणे फुगणे
नदीकिनारी वाळूवरती जाऊ आपण पुन्हा एकदा
औरस चौरस कुणी बांधल्या धर्माचा ह्या पक्क्या भिंती
युगा युगाच्या रस्त्यावरती फोडू आपण पुन्हा एकदा
नकोच काही मोघम ठेवू श्वासास इथे मध्यम ठेवू
काळजाचा हळुवार कप्पा देऊ आपण पुन्हा एकदा.
तलम वयाच्या नजाकतीवर शेर असे मी लिहिले पुष्पा
हृदयामधले खयाल हल्ली वाचू आपण पुन्हा एकदा
३.
तुझ्याविना कळी तिची फुलायचीच राहिली
जगायची कला तिला शिकायचीच राहिली
जणू मिठीत स्वर्ग हा किती हवा किती नवा?
नकोच आवरू तिला भिजायचीच राहिली
गुलाब तू सुवास तू तुझेच स्वप्न पाहते
अजून रात्रही तिची सरायचीच राहिली
लगा लगा लगा लगा लगावलीस भाळले
कलिंदनंदिनी तरी लिहायचीच राहिली.
चितेवरी जरी सख्या तुझीच वाट पाहिली
अखेर भेट ही कशी घडायचीच राहिली
............................................................
No comments:
Post a Comment